भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कामकाजावरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. तीन पक्षाचं सरकार… “खाटांची” रोज कुरकुर…समजूत काढायला रोज धावपळ…एक बाजू झाकली की दुसरंच काहीतरी उघडं पडत.. असं शेलार यांनी म्हटलं आहे.

टाळेबंदी हा शब्दच हद्दपार करायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार सांगत असले तरी याच मुद्दय़ावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. टाळेबंदीच्या मुदतवाढीबाबत पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा आक्षेप आहे. मुंबईत दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर न फिरण्याचा निर्णय घेताना गृहमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आल्याबद्दलही राष्ट्रवादीमध्ये नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

तीन पक्षाचं सरकार… “खाटांची” रोज कुरकुर…समजूत काढायला रोज धावपळ…एक बाजू झाकली की दुसरंच काहीतरी उघडं पडत..सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाडा.. या गदारोळात सरकारला विद्यार्थ्यांचा विसर पडू नये म्हणून हे स्मरण! आमच्या ATKT च्या विद्यार्थ्यांचा निर्णय अजून बाकी आहे!! असं शेलार यांनी ट्विट केलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या व्यावसायिक आणि कला, विज्ञान, वाणिज्य आदी पारंपरिक अभ्यासक्र मांच्या परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती सध्या तरी राज्यात नाही. त्यामुळे या परीक्षा न घेण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो निर्णय जाहीर केला. परंतु ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांसंदर्भात निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी या अगोदरही सरकारवर टीका केली आहे. “चमत्काराची वाट पाहणाऱ्यांचा चमत्कारीक कारभार सुरू आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं.

“परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय काढून आज १५ दिवस झाले. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. उच्च शिक्षण मंत्र्यांनी ना त्यावर बैठक घेतली? ना विद्यापीठात कसलेच “योग्य सूत्र” ठरले? चमत्काराची वाट पाहणाऱ्यांचा सगळा हा चमत्कारिक कारभार! वाचव रे बा, विठ्ठला!!,” असं शेलार यांनी या अगोदर ट्विट करून सरकारवर टिका केली आहे.

तसेच, यापूर्वी देखील एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या निर्णयावरून आशिष शेलार यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. “आदी(त्य) घोषणा आणि मग होमवर्क. म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात. वारंवार ‘परीक्षा रद्द’ एवढेच जाहीर होते. पण ATKT असलेल्यांबद्दल निर्णयाचे काय? निर्णय कधी याबाबत प्रसिद्धी माध्यमांना कुठलीच सूत्र माहिती देत नाहीत. दिवसागणिक विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढतेय,” असंही ते म्हणाले होते.