पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रियाचा पाऊस पडू लागला आहे. मोदी यांच्या घोषणेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांनी टीका करत काही सूचना केंद्र सरकारला केल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एक सूचना मोदी सरकारला केली होती. त्यावर उत्तर देताना भाजपानेच उलट सवाल उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीय यांनी देशासाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली. “आत्मनिर्भर भारतासाठी मागणी व पुरवठ्याची साखळी मजबूत करण्याची गरज पंतप्रधानांनी विशद केली. आजच्या ठप्प अर्थव्यवस्थेत मागणी वाढवायची असेल तर राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार देशातील कष्टकऱ्यांच्या खात्यात किमान ७,५०० रुपये जमा करण्याचा निर्णय केंद्रानं तातडीनं जाहीर करावा,” अशी सूचना अशोक चव्हाण यांनी केली होती.

अशोक चव्हाण यांनी केलेल्या सूचनेला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं. उपाध्ये यांनी एक ट्विट करून अशोक चव्हाणांना प्रश्न विचारले आहेत. “साधा प्रश्न. राज्य सरकारनं गोरगरिबांसाठी कोणतं पॅकेज गेल्या ५० दिवसात जाहीर केलं? राहुल गांधींचं सुद्धा राज्यातील सरकार ऐकत नाही?,” असा उपरोधित सवाल उपाध्ये यांनी अशोक चव्हाणांना विचारला आहे.

आणखी वाचा- २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज देणारे PMCare फंडासाठी एव्हढी जाहिरात का करत आहेत – मनसे

पंतप्रधान मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली असली, तरी त्यातील विस्तृत माहिती अजून समोर आलेली नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याविषयीची टप्प्याटप्यान सविस्तर माहिती देणार आहेत. तसं मोदी यांनी घोषणा करतानाच नमूद केलं होतं.