अजित पवार यांना शपथ घेताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले वाटले होते. पण आता वाईट वाटतात, असं का? असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. आमच्यासाठी जी व्यक्ती चांगली ती कायमसाठी चांगली अशी आम्हाला शिकवण मिळाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

“विरोधकांनी नेहमीच समोरच्यात भांडणं निर्माण करायची असतात, यात काही चूक नाही. आमची एक कोअर कमिटी आहे आणि आमचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहे. देवेंद्र फडणवीस यांची काही चूक झाली तरी आम्ही सांगतो. आमची काही चूक झाली तर ते आम्हाला सांगतात. आमच्यात काही विसंवाद असता तर तो पाच वर्षांमध्ये दिसला असता” असं म्हणतं कोणीही फडणवीस यांच्यावर नाराज नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा- “आम्हाला कोणत्याही पक्षासोबत सरकार स्थापन करण्यात रस नाही”

“देवेंद्र फडणवीस यांची कोणतीही हुकुमशाही नव्हती. त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिलं होतं. जेव्हा नेतृत्व चांगलं होतं तेव्हा चांगलं होतं. उद्धव ठाकरे यांनाही चांगलं वाटायचं. पण आता वाईट का? अजित पवार यांना शपथ घेतना देवेंद्र फडणवीस चांगले वाटले. पण आता वाईट? आम्हाला अशी शिकवण मिळाली नाही. जो चांगला तो नेहमीसाठी चांगला. सरकार गेलं म्हणून ते बदलणार नाही. देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते होते आणि राहतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.