“आम्हाला कोणत्याही पक्षासोबत सरकारस स्थापन करण्यात रस नाही,” असं रोखठोक मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. “आमचा निर्णय केंद्रीय नेतृत्व करतो. वर्षानुवर्षे आम्ही एकत्र काम केलं आहे. काही गोष्टींचा राग मनात असणं बरोबर आहे. परंतु आता सरकार स्थापन करणार नाही,” त्यांनी सांगितलं.

“कोणीही बोलावलं किंवा विचारणा केली तरी आम्ही कोणासोबतही सरकार स्थापन करणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. आमचे निर्णय हे केंद्रीय स्तरावर होत असतात. सध्या चौकशी लावणं, टोमणे मारणं असं प्रकार केले जात आहे. हे प्रकार योग्य नाहीत. यापूर्वी युती तुटली किंवा अशा काही प्रकारांमुळे मनात राग असणं स्वाभाविक आहे. परंतु यापूर्वी अनेकदा आम्ही एकत्र काम केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांना आम्ही आयुष्यभर संपवण्याचं स्वप्न पाहिलं. ही टर्म गेली असती तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा नामोनिशाणही राहिला नसता,” असं ते म्हणाले. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

आणखी वाचा- “अजित पवारांना शपथ घेताना देवेंद्र फडणवीस चांगले वाटले होते”

“आमच्या रागापोटी त्यांनी हे पाऊल उचललं. आमचं, समाजाचं नुकसान झालं तरी चालेल पण यांना धडा शिकवण्यासाठी विरोधकांना मदत करणार अशा प्रकारचं हे उचललेलं पाऊल आहे. उद्या शिवसेना बाहेर पडणार आणि सरकार स्थापन करण्याची ऑफर आली तर काही करण्याची आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत असेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.