विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर तोंडसुख घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज (१० जुलै) मुंबईत आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील मोदी सरकारवर टीका केली. तसेच इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी बैलगाडीतून आंदोलन करण्यात आलं. मात्र आंदोलनादरम्यान गाडी तुटल्याने मोर्चात एकच गोंधळ उडाला. या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी तोंडसुख घेतलं. तसेच राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना आवडलं नसल्याचा टोमणा मारला. तसंच पंकजा मुंडे आणि विधानसभा अध्यक्षपदावरही त्यांनी म्हणणं स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना देखील आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली.”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी हाणला. त्याचबरोबर पंकजा मुंडेबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “पंकजा मुंडे नाराज नाहीत. यावर आम्ही दोघांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे इतरांना जी काही पतंगबाजी करायची आहे. ती करू द्या.” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच विधानसभा अध्यक्षपदावरूनही महाविकास आघाडी सरकारला खडे बोल सुनावले. “आघाडीमध्ये अध्यक्षपदावर जर एकमत असतं. तर आतापर्यंत त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक घेतली असती. एकमत नाही म्हणूनच निवडणूक होत नाही.”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी हाणला. “स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर ज्या पद्धतीने सरकार जागं व्हायला पाहीजे होतं. तसं होताना दिसत नाही. केवळ भाषणबाजी करून दिलासा देऊ शकत नाही. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी कुठलीच गोष्ट सरकार करत नाही.”, असा निशाणा त्यांनी साधला.

केंद्रीय मंत्रिमंडळात प्रितम मुंडेंना स्थान न दिल्याने बीड जिल्ह्यात भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे!

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी भाई जगताप आणि काँग्रेसचे इतर नेते बैलगाडीतून आंदोलनात सहभागी झाले. मात्र, बैलगाडीची क्षमता लक्षात न घेता नेते, कार्यकर्ते बैलगाडीत चढले. भार जास्त झाल्याने बैलगाडी मोडली आणि भाई जगताप यांच्यासह गाडीत असलेले सर्वच नेते व कार्यकर्ते कोसळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच अनेक भाजपा नेत्यांनी आपल्या शैलीत टीप लिहीत हा व्हिडिओ शेअर केला आहे.