“जो उत्साह सरकारनं दारुची दुकानं उघडताना दाखवला त्यापैकी अर्धा उत्साह तरी धार्मिक स्थळं उघडण्यात दाखवावा. धार्मिक स्थळं उघडल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग राबवावं, लोकांनाही ते समजतं. हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे आणि सध्याच्या परिस्थितीत मानसिक आधाराचीही सर्वांना गरज आहे. धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय योग्य नाही. देशात अनेक ठिकाणी धार्मिक स्थळं उघडली परंतु ती उघडल्यामुळे कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोना पसरला असं झालं नाही. म्हणून आज घंटानाद आंदोलनही करत आहोत,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी सांगलीचा दौरा केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं.

आणखी वाचा- देशात सर्वत्र प्रार्थनास्‍थळे सुरू असताना महाराष्‍ट्रातच बंद का? : मुनगंटीवार

“राज्यात दारूची दुकानं उघडली, मॉल्स उघडले परंतु आम्ही धार्मिक स्थळं उघडण्यासाठी मात्र तयार नाही. ही परिस्थिती योग्य नाही. केंद्र सरकारनं धार्मिक स्थळं उघडण्यासाठी परवानगी देऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी लोटला. सर्व राज्यांनी धार्मिक स्थळं उघडली. परंतु महाराष्ट्रात धार्मिक स्थळं उघडायची नाहीत असा घेण्यात आलेला निर्णय अजब आहे,” असं फडणवीस म्हणाले. दारूच्या दुकानानं काय होतं आणि धार्मिक स्थळांमुळे काय होतं यातला फरक सांगण्याची आवश्यकता नसल्याचेही ते म्हणाले.

आणखी वाचा- “मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद”… म्हणत कोल्हापुरात घंटानाद आंदोलन

“जो उत्साह दारूची दुकानं उघडण्याचा आहे त्याच्या अर्धा उत्साह मंदिरं किंवा इतर धर्मांची धार्मिक स्थळं उघडण्यात सरकारनं दाखवावा. त्यावर सरकारनं निर्बंध घालावे. त्या ठिकाणी येणारे भाविक हे फिजिकल डिस्टन्सिंग पाळतील. लोकांनाही समजतं. ते जाऊन गर्दी करणार नाही. लोकांचा आस्थेचा विषय आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. सध्याची परिस्थिती अशी आहे की ज्यात लोकांना मानसिक आधारही लागतो. ज्या लोकांचा त्यावर विश्वास आहे त्यांना त्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मानसिक आधार मिळतो. धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा जो निर्णय आहे तो योग्य नसल्याचंही फडणवीस म्हणाले.