भाजपा नेत्या आणि माजी आमदार पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबात एक गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील काही उमेदवारांना आणि विद्यमान आमदारांना तिकिट नाकारण्यात आलं होतं. त्यावरून पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील काही उमेदवारांना तिकिट न देण्याचा तो निर्णय दिल्लीतून नाही तर राज्यातून घेण्यात आला होता, असं त्या म्हणाल्या.

विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांना तिकीटांचं वाटप करण्यात आलं होतं. परंतु काही उमेदवारांना तिकिट नाकारण्यात आलं होतं. तिकिच नाकारण्याचा हा निर्णय दिल्लीत घेण्यात आला नसून तो महाराष्ट्रात घेण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. पीटीआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मी भाजपा सोडणार आहे या वावड्या कुठून आल्या? असा सवालही मुंडे यांनी केला. मी नाराज नसून अशा वावड्या मी पक्ष सोडावा यासाठी जाणीवपूर्वक सोडल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला.

आपली कोणत्याही पदासाठी पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची चर्चा नसल्याचंही मुंडे यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीनं स्थापन केलेल्या सरकारवरही भाष्य केलं. विचारधारा मानणाऱ्यांचे नुकसान झालं असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. तसंच आपण नव्या सरकारवर टीका करणार नाही. आम्ही सर्वांनी यापूर्वीही एकत्र काम केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाला जवळून पाहिलं आहे. त्यांनी पक्षवाढीसाठी कायम प्रयत्न केले. जर कोणी दुखवत असेल तर त्याला ते पहिले जवळ करत असतं असं म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राज्यात ज्या प्रकारचे यश अपेक्षित होते, ते मिळालं नाही याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला हवी. माझ्या विरोधात दोन उमेदवार असते तर माझा पराभव झाला नसता. राज्यात आमचं सरकार असतानाही धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेता म्हणून आवश्यक ती सर्व मदत मिळाली, असंही त्या यावेळी म्हणाल्या.