भगवान गडावरील मेळाव्याला आज भाजपा आणि भाजपाच्या घटकपक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भगवान गडावर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, भाजपाचे नेते प्रकाश महेता, हरिभाऊ बागडे, एकनाथ खडसे, महादेव जानकर, पाशा पटेल उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना चंद्रकांत पाटील यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न आणण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.

चंद्रकांत पाटील यांचा सन्मान केला गेला पाहिजे. कोणीही त्यांच्या भाषणात व्यत्यय आणू नका. चंद्रकांत पाटील यांचा सन्मान झालाच पाहिजे. त्यांच्या भाषणात कोणीही गोंधळ घालू नये, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं.

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचं दुःख आम्ही समजू शकतो. भविष्यात जेव्हा सगळं चांगलं होईल तेव्हा तुम्हाला अपराधी वाटता कामा नये, की त्यावेळी आपण काय बोलून गेलो? मराठी शब्द वापरताना थोडे जपून वापरा. काही घटना नक्की घडल्या मात्र त्यांचा विचार होईल आणि त्यावर योग्य ते उपाय योजले जातील असंही आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी बोलताना दिलं. पक्षावर राग काढू नका. हे आपलं घर आहे, घरातलं भांडण रस्त्यावर नको असंही पाटील यावेळी म्हणाले.