गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यात शाब्दीक चकमक सुरू आहे. “जनतेनं मला सलग सहा वेळा निवडून दिलं. प्रसाद लाड यांनी किमान एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवावं,” असं आव्हान खडसे यांनी दिलं होतं. दरम्यान, प्रसाद लाड यांनीदेखील एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत?,” असा सवाल लाड यांनी केला आहे.

“स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे,” असं लाड म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून खडसे यांच्यावर निशाणा साधला. “आजवरच्या राजकारणात भाजपा संघटना आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला. ज्या पक्षाने एवढं दिलं, अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पदं उपभोगली, तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द? एकनाथ खडसे म्हणतात…

काय म्हणाले होते खडसे?

“मी भाजमधून गेल्याचा परिणाम होत नसेल, तर भाजपचे पदाधिकारी सतत एकनाथ खडसे गेल्यावर परिणाम होणार नसल्याचं का म्हणतात? असा सवाल खडसे यांनी केला होता. तसंच उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्वीपेक्षा कमी आमदार निवडून आले असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच आपल्या मुलीचा पराभव झाल्याच्या बाबतही खडसेंनी भाष्य केलं होतं. “आपल्या मुलीचा पराभव करण्यासाठी पक्षविरोधी काम करण्यात आलं. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाच ही जागा पाडण्यासाठी आतून पाठिंबा होता,” असा आरोप खडसे यांनी केला.