“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री हिंदूंचा अपमान करतो आणि बाळासाहेब ठाकरे यांची हिदुत्वाची भाषा करणारी शिवसेना गप्प का बसली आहे? आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी हे खपवून घेतलं नसतं,” असं म्हणत भाजपा नेते राम कदम यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कुठे झाले हे सांगू शकत नाही, परंतु मुस्लिम सांगू शकतात. त्यांच्या हक्काचं कब्रस्तान आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर राम कदम यांनी संताप व्यक्त केला. आव्हाडांचं वक्तव्य हे दुर्देव आहे. त्यांनी तात्काळ आपलं विधान मागे घ्यावं, अशी मागणी राम कदम यांनी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही हल्लाबोल केला. “आव्हाडांचं वक्तव्य हे दुर्देवी आहे. त्यांनी केळ हिंदूंचाच नाही तर मुस्लिम समाज सोडून ज्या धर्मामध्ये दफनविधी केला जात नाही, त्या धर्माचा अपमान केला आहे,” असं ते म्हणाले. तसंच त्यांनी हिंदू धर्माची माफीदेखील मागितली पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.

काय म्हणाले होते आव्हाड?
देशातील हिंदू आपल्या आजोबा, पणजोबांचे अंत्यसंस्कार कोणत्या ठिकाणी झाले हे सांगू शकणार नाहीत. परंतु मुस्लिम हे हक्कानं सांगू शकतील. त्यांच्याकडे त्यांच्या हक्काचं कब्रस्तान आहे. ते आपल्या आजोबा, पणजोबांचे दफनविधी कोणत्या कब्रस्तानमध्ये झाले आहेत हे सांगू शकतात, असं आव्हाड म्हणाले होते. १८ जानेवारी रोजी भिवंडीतील सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.