पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढल्या जाव्यात या दोन अटींवर आपण राजीनामा मागे घेतल्याचे आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांशी सुमारे सव्वातीन तास झालेल्या चर्चेत आपल्या दोन अटी मान्य केल्यामुळे राजीनामा मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षणमंत्री सुभाष भामरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत गोटे यांनी राजीनामा दिला होता. पंरतु, जर पक्षाने दगाफटका केला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

रावसाहेब दानवेंमुळे भाजपमध्ये गुंडांचा प्रवेश- अनिल गोटे

अंतर्गत वादामुळे अनिल गोटे यांनी राजीनामा दिला होता. नामचीन गुंडांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्षात प्रवेश देतात. मते वाढवण्यासाठी गुंडांना प्रवेश दिल्याची वक्तव्ये करतात. भाजपचे केवळ सत्तेसाठी होत असलेले अध:पतन मन अस्वस्थ करणारे आहे. मतांची संख्या वाढ करण्याकरिता आम्ही गुंडांना प्रवेश देतो, असे दानवे सांगतात. गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती. आज ते हयात असते, तर तुम्ही असे धाडस केले असते का, असा प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी राजीनामा देताना उपस्थित केला होता.