गणेशोत्सव अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेला असताना, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. प्रत्येक वर्षी मुंबई आणि लगतच्या परिसरातून हजारो चाकरमानी कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जातात. मात्र यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ७ ऑगस्ट मर्यादा ठेवली आहे. तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना करोनाची चाचणी आणि जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर ७ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. मात्र भाजपा आमदार नितेश राणे यांनी, कोकणात येणाऱ्या भाविकांची राज्य सरकारने ज्या ठिकाणावरुन निघणार त्याच ठिकाणावरुन करोना चाचणी करावी अशी मागणी केली आहे.

चाकरमानी ज्या ठिकाणावरुन कोकणात येण्यासाठी निघणार आहेत, त्याच ठिकाणी त्यांची करोना चाचणी व्हावी. या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास तरच कोकणात प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर आपण निगेटीव्ह असल्याचा अहवाल दाखवला तर पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी होईल, आणि भाविकांना क्वारंटाइन करण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची सरकारने मोफत करोना चाचणी करावी अशी मागणी राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवावरही करोनाचं सावट आहे. सार्वजनिक मंडळांना यंदा मूर्तीची ४ फुट मर्यादा घालून देण्यात आलेली असून, मिरवणूक सोहळा व इतर सर्व समारंभ यंदा रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंडळांनी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर यासारखे उपक्रम राबवत सरकारला मदत करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. कोकणातही यंदा साध्या पद्धतीने सण साजरा करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.