मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झाला आहे असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर एकीकडे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. दरम्यान भाजपा नेत्यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“करोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते,” शिवसेना आमदाराचं वक्तव्य

भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले…हे या गायकवाडला कोण सांगेल. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर,” असं नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील संजय गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. “यथा सूडबुद्धी जनाबसेना पक्षप्रमुख तथा टुकार जनाबसैनिक…अरे मंदबुद्धी, ते जंतू नसतात विषाणू असतात,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

संजय गायकवाड काय म्हणाले आहेत –
“भाजपाच्या लोकांचं नीच राजकारण सर्व महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंपा नावाचे ते चंद्रकांत पाटील…आज हा करोना कोणा पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही. करोना फक्त काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला होत नाही. तर हा करोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला विळखा घालत आहे. आज बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला देण्यासाठी लसी आहेत, पण महाराष्ट्राला नाही. बांगलादेश, पाकिस्तान महाराष्ट्रपेक्षा जास्त महत्वाचे आहेत का? ही राजकारण करण्याची वेळ आहे,” असं ते म्हणाले.

“त्यांच्या १०५ आमदारांनादेखील महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले आहे हे भाजपाने विसरु नये. त्यांचे २० खासदारदेखील महाराष्ट्राने निवडून दिले आहेत. अशावेळी केंद्रांकडून राज्यातील लसनिर्मिती कंपन्याना सांगितलं जातं की तुम्ही महाराष्ट्राला लस, तसेच रेमडेसिविर देऊ नका. केंद्राकडे ऑक्सिजनची देखील मागणी केली तरी केंद्र सरकार देत नाही,” अशी टीका त्यांनी केली.

“मोदी सरकार, फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. फडणवीस मुख्यमंत्री असते तर नरेंद्र मोदींनी काय केलं असतं? चंद्रकांत पाटील मंत्री असते तर काय केलं असतं? राज्यातील मंत्री जीव तोडून नियोजन करत असताना मदत करायची सोडून राजकारण करत आहेत, खिल्ली उडवतात. हे सरकार अपयशी होईल हे पाहतात. पण यामध्ये लाखो लोक मरतील त्याचं काय?,” अशी विचारणा संजय गायकवाड यांनी केली.

“मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झाला आहे. म्हणून राजकारण न करता राज्याला मदत केली पाहिजे. आधी महाराष्ट्र जगला पाहिजे, नंतर राजकारण आहे. माणसंच मेली तर कोण मतदान करणार आहे तुम्हाला,” असं शेवटी ते म्हणाले.