‘एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन’, असे विधान केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भाजपाचे आमदार राम कदम यांना अखेर उपरती झाली आहे. गुरुवारी राम कदम यांनी ट्विटरवरुन महिलांची माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान केले. एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे राम कदम यांनी म्हटले होते. राम कदम यांचे हे विधान वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियावर प्रसारित होताच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. विविध राजकीय पक्षांसह महिला संघटनांनीही राम कदम यांच्या विधानाचा निषेध केला. राज्याच्या महिला आयोगाने कदम यांना नोटीसही बजावली.

सुरुवातीला माफी मागण्यास नकार देणाऱ्या राम कदम यांना अखेर उपरती झाली आहे. गुरुवारी सकाळी राम कदम यांनी ट्विटरवर माफीनामा टाकला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी राम कदम यांच्या माफीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. प्रसारमाध्यमांमध्ये टीकेची झोड उठल्यानंतर राम कदमांनी माफी मागितली. ही माफी मनापासून आहे का हा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ram kadam apology kidnap girl for men statement
First published on: 06-09-2018 at 10:43 IST