उस्मानाबाद जिल्ह्य़ात भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील खानदानी दुष्मनी पुन्हा उफाळून आली असून यात एकमेकांच्या विरोधात प्राणघातक हल्ले करण्याचे गुन्हे सोलापूर जिल्ह्य़ातील अकलूज पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. यापूर्वी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी त्यांचे प्रतिस्पर्धी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरही तशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुका पंचायत समितीच्या सदस्यांची पळवापळवी करण्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे दिसून येते.

माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगाव येथे दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे साडू हिंमतराव पाटील यांच्या घरात कळंब तालुका पंचायत समितीचे सदस्य आणून ठेवल्याच्या संशयावरून तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या रविवारी रात्री तेथे आले होते. त्यांनी हिंमतराव पाटील यांच्या  रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावले व बेदम मारहाण केली. तसेच त्यांचे बंधू रवींद्र पाटील यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. या गोंधळामुळे आसपासचे लोक जमा झाल्यानंतर राणा जगजितसिंह व त्यांचे सहकारी पळून जाताना त्यांची मोटार तेथेच सोडून गेले. परंतु त्या वेळी हिंमतराव पाटील व इतरांनी पाठलाग करून चार जणांना पकडले आणि त्यांना पोलिसांच्या हवाली केले होते. यात राणा जगजितसिंह यांच्यासह १९ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यांची मोटारही जप्त केली होती.

तथापि, पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांपैकी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेले सतीश सत्यनारायण दंडनाईक  यांनी तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. यात आरोपी म्हणून हिंमतराव पाटील व त्यांचे बंधू रवींद्र पाटील यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर तसेच अन्य अनोळखी सहा जणांचा उल्लेख आहे.

दंडनाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कळंब तालुका पंचायत समितीच्या तीन सदस्यांना पळवून आणून माळेवाडी बोरगाव येथे हिंमतराव पाटील यांच्या घरात ठेवल्याची माहिती मिळाल्यावरून दंडनाईक यांच्यासह गणेश भातलवंडे व वाहनचालक पोपट चव्हाण आदी मिळून खासगी मोटारीने त्या ठिकाणी गेले होते. पाटील यांना भेटून कळंब तालुका पंचायत समितीचे सदस्य असल्याबद्दल खात्री करायची असल्याचे सांगितले तेव्हा पाटील व त्यांच्या साथीदारांनी दंडनाईक यांना बेदम मारहाण केली. त्या वेळी पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोबाइलद्वारे संपर्क साधला. तेव्हा ओमराजे निंबाळकर यांनी, त्याला सोडू नका, त्याला चांगला धडा शिकवा, असे मोबाइलच्या स्पीकर फोनवर ओरडून सांगितले. त्यानंतर आपणास हिंमतराव पाटील यांनी सत्तूरने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला असता प्रसंगावधान ओळखून तो वार आपण चुकविला. त्यामुळे आपला जीव वाचला. इतर लोकांनी आपल्या सोबत असलेले गणेश भातलवंडे यांच्यावरही हल्ला केला, असे दंडनाईक यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आपली मन:स्थिती ठीक नसल्यामुळे आपण उशिरा फिर्याद दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.