बीड जिल्ह्यातील परळी येथे भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या ‘यशश्री’ या निवसास्थानासमोरच हा सर्व प्रकार झाल्याने, याची अधिकच चर्चा सुरू आहे.

मनसे कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती देखील समोर आली आहे.ऊसतोड मंजुरांचे एफआऱपीचे बिल पन्नगेश्वर साखर कारखान्याकडून थकल्यामुळे मनसेच्यावतीने कारखान्याच्या संचालक पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंच्या घराबाहेर जमले होते. मात्र, पोलिसांनी आंदोलनास मज्जाव केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. दुसऱ्याबाजुनी पंकजा मुंडेंचे समर्थक व भाजपा कार्यकर्ते देखील घटनास्थळी मोठ्यासंख्येने उपस्थित असल्याने दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. शिवाय, काही कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.