News Flash

रावसाहेब दानवेंचा फोटो पाहून खैरेंचा चढला पारा; पदाधिकाऱ्यांना झापले

युती असताना खैरे-दानवे यांच्यातील वाद अनेकदा समोर आला होता.

नवनिर्वाचित उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना पदभार देण्यासाठी शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद महानगरपालिकेत उपस्थिती दर्शवली होती. महापौरपदाच्या दालनात जाताच चंद्रकांत खैरे यांना खुर्चीच्या मागे असलेला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा फोटो दिसला अन् त्यांचा पार चढला. त्यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि नेत्यांवर खवळले. नेत्याचे आदेश येताच फोटो काढण्यासाठी कार्यकर्ते पुढे आले. कार्यकर्त्यांनी महापौरांच्या दालनातील भाजपाच्या नेत्यांचे फोटो काढल्यानंतर जंजाळ यांना पदभार देण्याचा सोहळा रंगला. दरम्यान, युती असताना खैरे-दानवे यांच्यातील वाद अनेकदा समोर आला होता. माझ्या पराभवामागे दानवेंचा हात असल्याचा आरोप खरै यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता.

पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचे कारण  पुढे करत भाजपाचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाला दूर ठेवत शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी ५१ मते घेत विजय मिळविला. काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे सहकार्य घेत शिवसेनेला या निवडणुकीमध्ये एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी मतदान केल्याचेही स्पष्ट झाले. भाजपाने अपक्ष उमेदवार गोकुळ मलके यांना पुरस्कृत केले होते. त्यांना ३४ मते मिळाली. उपस्थित १०० सदस्यांपैकी दोन नगरसेवक तटस्थ राहिले तर १५ सदस्य गैरहजर होते.

ज्या योजनांना कार्यारंभ आदेश दिलेले नाहीत, अशा सर्व योजनांना स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यात औरंगाबाद शहराच्या अलीकडेच मंजूर करण्यात आलेल्या १६८० कोटी रुपयांच्या पाणी योजनेला मिळालेली मंजुरी अडकली. यावरून भाजपाने शिवसेनेला पेचात पकडण्यासाठी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सेना-भाजपातील महापालिकेतील युती तुटल्याचे जाहीर करण्यात आले. या राजीनाम्यामुळे उपमहापौरपदाची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली. पीठासीन अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने अपक्ष उमेदवार गोकुळ मलके यांना पुरस्कृत केले होते. एमआयएमचे शेख जफर अख्तर यांनीही निवडणूक लढविली. औरंगाबाद महापालिकेमध्ये शिवसेना व अपक्षांचा ४० जणांचा गट आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची भर पडेल असे मानले जात होते. मात्र, काँग्रेसचे अफसरखान, आयुब खान हे सदस्य तटस्थ राहिले.

पक्षाकडून उपमहापौरपदाची संधी मिळावी अशी अपेक्षा होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे अफसर खान यांनी मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाऊसाहेब जगताप, साहेल शेख, सायली जमादार, शबाना कलीम कुरेशी, अनिता साळवे यांनी शिवसेनेला मतदान केले. तर वैशाली जाधव यांनी भाजपचे गोकुळ मलके यांना मतदान केल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता विधाते, मोरे यांची मते मिळाली. चार सदस्यांपैकी दोन सदस्यांची मते शिवसेनेच्या पारडय़ात पडली. तसेच एमआयएमच्या दोन नगरसेवकांनीही शिवसेनेला मतदान केले. एमआयएमचे औरंगाबाद महापालिकेमध्ये २५ सदस्य असून एक सदस्य गाव सोडून गेले आहेत, तर सय्यद मतीन हे नगरसेवक  सध्या कारागृहात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीमधील सर्व सदस्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या दोन सदस्यांच्या पाठिंब्यांवर राजेंद्र जंजाळ हे उपमहापौर झाले. महापालिका निवडणुकीसाठी केवळ तीन महिने असताना घडलेले हे राजकीय बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 12:37 pm

Web Title: bjp mp ravsaheb danave shivsena ex mp chandrakant khaire aurngabad nck 90
Next Stories
1 मालवण: बाळासाहेबांचा फोटो पाहताच आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर म्हणाले…
2 रायगड- उरणजवळ तेलाने भरलेले टँकर उलटले, रस्त्यावर तेल पसरल्याने वाहतूक कोंडी
3 “…तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”; मंत्रिमंडळातून डावललेल्या रामदास कदमांवर घणाघाती टीका
Just Now!
X