राज्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यात मनसुख हिरेन, अँटिलिया बॉम्ब प्रकरण, परमबीर सिंह यांचं पत्र त्यापाठोपाठ आता सचिन वाझे यांचं पत्र यावरून राज्याच्या राजकारणात चांगलीच घुसळण पाहायला मिळत आहे. त्यावर आता भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे”, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. राज्यातील घडामोडींचा, करोनाचा आणि राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनचा यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला!

“राज्य सरकार चुकीचे निर्णय घेणार नाही!”

सातारा येथे पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले,”गो करोना गो करोना असे म्हणून करोना जाणार नाही. त्यामुळे शासनाने लावलेल्या निर्बंधांबाबत योग्य तो पुनर्विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यांनाही कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत. मात्र, आरोग्य महत्वाचे आहेच पण खाण्याचे काय? याचाही विचार सरकारने करावा. त्यामुळे सरकारने लोकहिताचे निर्णय घ्यावेत. जगाच्या पोटात या संसर्गाने भीतीचा गोळा निर्माण केला. या आजाराच्या नुसत्या भितीने लाखो लोक हृदयविकाराने गेले. त्यामुळे लोकांनी न भिता संसर्गाचा सामना करावा”, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

“लॅाकडाउन नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा…,” उदयनराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

“ही तर फक्त सुरुवात आहे!”

दरम्यान, शरद पवार यांची उदयनराजे भोसले यांनी भेट घेतल्यानंतर त्यावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले होते. त्यावर देखील उदयनराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिलं. “शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी भेटलो. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. मात्र सध्या राज्याचं राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे. ही तर सुरुवात आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. तेव्हा कळेल राजकारण कुठं चाललंय”, असंही खासदार उदयनराजे म्हणाले.