वेध विधानसभा

नितीन पखाले, यवतमाळ</strong>

लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश, जिल्ह्य़ातील सहा विधानसभा मतदारसंघांवर असलेले ‘युती’चे वर्चस्व, मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, स्थानिक स्वराज्य संस्थांसह, जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये प्राबल्य, यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात भाजप-शिवसेनेची स्थिती भक्कम दिसत आहे. तर काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी असली तरी अंतर्गत आव्हानांमुळे या पक्षाची वाट बिकट आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी-केळापूर, उमरखेड या पाच विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत  तर दिग्रस येथे शिवसेना आणि पुसद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. आघाडीच्या सत्ता काळात जातीय समीकरणांवर जिल्ह्य़ांत विधानसभा निवडणुकीची गणिते मांडली जायची. या समीकरणांना भाजपने गेल्या वेळी छेद दिला. यवतमाळ, वणी या खुल्या मतदारसंघासह अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता आरक्षित उमरखेडसारख्या मतदारसंघातही जातीचा फारसा प्रभाव नसलेल्या उमेदवारास निवडून आणले. त्यामुळे या जिल्ह्य़ातील ‘डीएमके’(देशमुख, मराठा, कुणबी) हा घटक केवळ लोकसभा निवडणुकीतील यशापयशापुरता मर्यादित राहिला. राळेगाव, आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असून या मतदारसंघावर वर्षांनुवर्षे असलेली काँग्रेसची मक्तेदारीही भाजपने मोडीत काढली. पुसद आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघ हे खुले असले तरी येथे बंजाराबहुल मतदार असल्याने येथील आमदार अनुक्रमे मनोहर नाईक व संजय राठोड यांच्या विरोधात कोणीही उभे असले तरी त्यांचे वर्चस्व अबाधित असते.

पुसदमधील समीकरणे बदलणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून या पक्षात असलेले पुसदचे आमदार मनोहर नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत जाणार असल्याचे जाहीर केल्याने या वेळी मात्र पुसदमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन संपूर्ण नाईक कुटुंब शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी मनोहर नाईकांना पक्ष न सोडण्याची गळ घातल्याने सध्या त्यांचा निर्णय व्हायचा आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी नाईक कुटुंब शिवसेनेत येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पुसदवरील ताबा शिवसेनेकडे जाईल, असे मानले जात आहे. पुसद वगळता जिल्ह्यात इतरत्र राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नाही. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीकरिता घेतलेल्या मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली. सातही विधानसभा मतदारसंघांतून ७५ उमेदवारांनी मुलाखत दिली. २०१४ मध्ये शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, विजय खडसे, राहुल माणिकराव ठाकरे ही दिग्गज मंडळी पराभूत झाली होती. या सर्वानी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. मात्र काँग्रेसमधील तरुणांचा पक्षातील ज्येष्ठांना विरोध आहे. ज्येष्ठांऐवजी तरुण उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी काँग्रेसमधून होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांना निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत आव्हाने दूर करण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

भाजपकडे मदन येरावार (यवतमाळ), प्रा. डॉ. अशोक उईके (राळेगाव), राजेंद्र नजरधने, (उमरखेड), राजू तोडसाम (आर्णी), संजयरेड्डी बोदकुरवार (वणी) असे पाच आमदार आहेत.  यवतमाळात मदन येरावारांविरोधात काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर लढण्याची शक्यता आहे. ही लढत झाल्यास ती चुरशीची होईल. शिवाय फसलेली अमृत योजना, पिण्याच्या पाण्याची बारमाही टंचाई, शहरातील कचरा प्रश्न यामुळे शहरी मतदारांत असलेली नाराजी भाजपची चिंता वाढवणारी आहे. राळेगाव मतदारसंघाला नुकत्याच मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदामुळे येथील जागा भक्कम स्थितीत आली आहे. त्यामुळे येथे काँग्रेसकडून निवडणूक लढवू इच्छिणारे माजी मंत्री वसंत पुरके यांच्या आव्हानांत वाढ झाली आहे. आर्णीचे विद्यमान आमदार विविध वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत राहिले तरी चंद्रपूर-आर्णी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमदेवार हंसराज अहीर यांना सर्वाधिक ५७ हजारांचे मताधिक्य आर्णी मतदारसंघात मिळाले. अहीर पराभूत झाले असले तरी तोडसाम यांचे पक्षातील स्थान या मताधिक्यामुळे बळकट झाले. या मतदारसंघात काँग्रेसकडून माजी मंत्री शिवाजीराव मोघे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा त्यांना वयामुळे होणारा रोष ते कसा कमी करतात, यावरच पुढील चित्र स्पष्ट होईल.

पूर्वी युतीत शिवसेनेच्या वाटय़ाला असलेले वणी, उमरखेड हे मतदारसंघ गेल्या वेळी हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे भाजपच्या ताब्यात गेले आहेत. आता वणी, उमरखेड या मतदारसंघांवर शिवसेनेने हक्क सांगितला आहे. भाजपने हे मतदारसंघ पूर्वीप्रमाणे शिवसेनेला द्यावे, असा आग्रह शिवसेनेत आहे. जिल्ह्य़ांत दिग्रस, वणी, उमरखेड या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. मात्र, विद्यमान आमदारांना डावलून भाजप असा निर्णय घेण्याची शक्यता नसल्याने या मतदारसंघात शिवसेनेसमोरची समस्या वाढली आहे. स्थानिक पातळीवर साडेचार वर्षे एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यानंतर आणि आता लढण्याची सर्व तयारी झाली असताना तलवारी ‘म्यान’ करणे अनेकांना कठीण झाले आहे. त्यामुळेच गेल्या वेळी केवळ १ हजार २०० मतांनी पराभूत झालेल्या शिवसेनेच्या एका उमेदवाराने युती झाल्यास यवतमाळातून अपक्ष लढण्याची तयारीही चालवली आहे.

पक्षांतर्गत हेवेदावेच अडथळा

भाजप, शिवसेनेला विजयासाठी पोषक वातावरण असले तरी पक्षांतर्गत हेव्यादाव्यांमुळे या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. अंतर्गत कलहामुळे जिल्ह्य़ात काँग्रेसचे पानिपत झाल्याचे उदाहरण डोळ्यासमोर असले तरी वाढत्या राजकीय वर्चस्वाच्या अहंकारात भाजप, शिवसेनेची वाटचालही काँग्रेसच्याच मार्गावरून सुरू असल्याची खंत निष्ठावान कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. शिवसेना, भाजप या सत्ताधारी पक्षातही दोन गट स्वतंत्रपणे काम करीत आहेत. शिवसेनेत संजय राठोड यांच्या वर्चस्वाला पक्षातूनच शह देण्याचा प्रयत्न होत आहे, तर भाजपात स्थानिक आमदार कोणालाच विचारात घेत नसल्याने अस्वस्थता आहे. निवडणुकीपर्यंत ही स्थिती अशीच राहिली तर या पक्षांच्या सांघिक यशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ जिल्हा

राजकीय चित्र

* यवतमाळ         भाजप

* वणी                  भाजप

* राळेगाव            भाजप

* आर्णी-केळापूर  भाजप

* उमरखेड           भाजप

* पुसद                राष्ट्रवादी काँग्रेस</p>

* दिग्रस              शिवसेना