एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यामुळेच आपण पक्षत्याग करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. याचसोबत त्यांनी एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा गंभीर आरोपही केला होता. यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ शी बोलत होते.

आणखी वाचा- “वाजपेयी-अडवाणी नसल्यानंही भाजपा थांबला नाही, खडसेंमुळेही थांबणार नाही”

रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, “भाजपामध्ये सामूहिक पद्धतीने निर्णय घेतले जात असून कोणतीही एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. एकट्या देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष चालत नाही. मी प्रदेशाध्यक्ष असताना काही गोष्टी फडणवीसांना मान्य नव्हत्या, पण मी पटवून दिल्यावर त्यांनाही मान्य कराव्या लागल्या. त्यामुळे एकटे फडणवीस पक्ष चालवतात हा आरोप चुकीचा आहे”.

आणखी वाचा- एकनाथ खडसेंनी स्वतः केलेल्या उद्योगांचा विचार करावा, भाजपाची खोचक टीका

“उत्तर महाराष्ट्रात भाजपाकडे एकनाथ खडसे यांची उणीव भरुन काढणारे नेते आहेत. जळगावात आमच्याकडे रक्षा खडसे, सुरशे भोळे आणि गिरीश महाजन यांच्यासारखे नेते आहेत. नाशिक व अहमदनगरमध्येही आमच्याकडं सक्षम नेतृत्त्व आहे. त्यामुळे आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता वाटत नाही. आम्हाला चिंता आहे ती नाथाभाऊंनी पक्ष सोडल्याची, मात्र आता त्यांनी निर्णय घेतल्याने हा विषय संपला आहे,” असं दानवे म्हणाले.