|| प्रबोध देशपांडे

पश्चिम वऱ्हाडात लोकसभेपाठोपाठ विधानसभेत भाजप-शिवसेनेने आपल्या जागा कायम राखल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी झालेल्या अटीतटींच्या लढतीमध्ये मतांचा आलेख उतरला आहे. भाजप-शिवसेनेचे अध्र्या मतदारसंघात मतदान घटले. अकोला जिल्हय़ातील पाचही मतदारसंघात मते घटली. बुलढाणा जिल्हय़ातील चार मतदारसंघात मते वाढली, तर दोन मतदारसंघात कमी झाली. वाशीम जिल्हय़ातील एक मतदारसंघात वाढली, तर दोन जागांवर मतांना उतरती कळा लागली.

पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्हय़ात विधानसभेचे एकूण १५ मतदारसंघ येतात. लोकसभेच्या निवडणुकीत अकोला, बुलढाणा आणि वाशीम-यवतमाळ मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे विधानसभेमध्येही भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांचा सहज यश मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, जागा कायम राखताना महायुतीची चांगलीच दमछाक झाली. सर्वाधिक नऊ जागा भाजप, शिवसेना तीन, काँग्रेस दोन व राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. काही अपवाद वगळता सर्वच ठिकाणी तुल्यबळ लढती झाल्या. अकोला लोकसभा मतदारसंघात संजय धोत्रे यांनी तब्बल दोन लाख ७५ हजार ५९६ मताधिक्य घेत विजय मिळवला.

त्यांना विधानसभेच्या सर्वच मतदारसंघात ७८ हजारापेक्षा अधिक मते मिळाली. मात्र, विधानसभेत ही मते कायम राहिली नाहीत. अकोला पश्चिममध्ये संजय धोत्रेंना ७८ हजार ७६९ मते मिळाली होती, तर गोवर्धन शर्माना ७३ हजार २६२ मतांवर समाधान मानावे लागले. अकोला पूर्वमध्ये १० हजार ४७५ मते घटली. याशिवाय अकोट ४८ हजार १२०, मूर्तिजापूर ३० हजार ५८८, बाळापूर ११ हजार १४५ व रिसोड मतदारसंघामध्येही महायुतीची तब्बल ७२ हजार ६३० मते कमी झाली आहेत. बुलढाणा जिल्हय़ामध्ये चार मतदारसंघात मते वाढली, तर दोन मतदारसंघात घटली आहेत. बुलढाणा लोकसभेत शिवसेनेचे प्रतापराव जाधवांनी एक लाख ३३ हजारा २८७ मतांनी विजय मिळवला. मेहकरमध्ये २६ हजार ८३४, जळगाव जामोद नऊ हजार २४४, चिखली तीन हजार २८६, खामगावमध्ये एक हजार ९१५ मते वाढली आहेत. बुलढाणा १४ हजार ९९२ व सिंदखेड राजा ११ हजार ६३६ मते घटली आहेत. जिल्हय़ातील मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा रावेर लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या वाशीममध्ये मते कमी झाली, तर कारंजा मतदारसंघामध्ये महायुतीची किंचित वाढली आहेत. वाशीममध्ये २८ हजार ९१९ मते कमी झाली. कारंजामध्ये दोन हजार १४९ मते वाढली आहेत.