News Flash

वर्धा जिल्ह्य़ात भाजप सरस, सेना शून्य

देवळीत काँग्रेसचे रणजीत कांबळे हे सर्वच बाजूने सक्षम असल्याचे सर्वमान्य मत होते.

(संग्रहित छायाचित्र)

|| प्रशांत देशमुख

निष्प्राण काँग्रेसला नवसंजीवनी :- भाजपला विधानसभा निवडणूकीत शंभर टक्के यश देतानाच मतदारांनी मरगळलेल्या काँग्रेसमध्येही धुगधुगी फुंकल्याचे चित्र आहे. जिल्हय़ातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट येथे भाजपचे आमदार झाले. तर देवळीत काँग्रेसच्या रणजीत कांबळे यांनी पाचव्यांदा विक्रमी विजय पटकावला. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी भाजप विजयी झालेल्या मतदारसंघात जोरदार लढत दिली. सर्वच ठिकाणी परिचित चेहरे युती व आघाडीकडून उभे होते. मतदारांनी या चेहऱ्यातून एकाची निवड केली. वंचित, बसप, बंडखोर, अपक्ष यांना थारा मिळाला नाही. तसेच चर्चेत असलेल्या ‘नोटा’चाही कुठे प्रभाव दिसला नाही. या निवडणुकीने अनेकांच्या राजकीय आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

वर्धेत भाजपचे डॉ. पंकज भोयर यांनी दुसऱ्यांदा विजय खेचला. काँग्रेसच्या शेखर शेंडे यांना मात देताना त्यांनी राजकीय व्यवस्थापनातील कौशल्यच दाखवून दिले. शेंडेंच्या सहकाऱ्यांच्या तुलनेत भोयर यांचे सहकारी सक्षम ठरले. निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपसाठी खड्डे समजले जाणारे परिसर डॉ. भोयर यांनी सर्व ते कौशल्य पणास लावून बुजविले. त्यामुळे ही लढाई पक्षीय पातळीवर न जाता व्यक्ती पाहून झाल्याचे म्हटले जाते. अंतर्गत विरोधकांना मार्गी लावण्यात भोयर यांना आलेले यश त्यांचा विजय निश्चित करणारे ठरले.

देवळीत काँग्रेसचे रणजीत कांबळे हे सर्वच बाजूने सक्षम असल्याचे सर्वमान्य मत होते. त्यांच्या विरोधात सेनेचे समीर देशमुख व भाजप बंडखोर राजेश बकाणे यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण ते तोकडे ठरले. बंडखोर असणाऱ्या बकाणे यांना पक्षीय मदत झालीच. त्यामुळेच लढतीत ते दुसऱ्या स्थानावर आहे. ऐनवेळी शिवबंधन बांधणारे समीर देशमुख यांची उमेदवारी प्रभावी करणारी एकही यंत्रणा नव्हती. देवळी भागात मरगळलेल्या अवस्थेत असणाऱ्या सेनेपेक्षा देशमुखांना भाजप नेत्यांवरच भिस्त ठेवावी लागली. उमेदवार आला काय, गेला काय, आमच्यावर काही फ रक पडत नाही. अशा नेत्यांवर राहलेली भिस्त व स्वत:ची कमकुवत यंत्रणा देशमुखांचा पराभव दारूण करणारा ठरला. पाचव्यांदा लढणारे कांबळे यांनी ही लढाई एकतर्फी समजूनच लढली. कुठे काय पेरायचे व मतांचे पीक कसे घ्यायचे यात तज्ज्ञ असणाऱ्या कांबळेंनी विजयाला विक्रमी केले.

हिंगणघाटमध्ये भाजपचे समीर कुणावार भरघोस मतांनी निवडून आले. पण गतवेळीपेक्षा त्यांचे मताधिक्य २५ हजारांनी घटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे यांनी त्यांना चांगली लढत दिली. परंतु पक्षातूनच झालेला विरोध व निष्क्रिय काँग्रेस तिमांडेंना पराभवाकडे नेणारी ठरली. राकाँतील धुरंधर व सहकारनेते अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्याशी घेतलेला पंगा महागात पडला. ऐनवेळी कोठारी गटाने भाजपचे कुणावार यांच्या पारडय़ात वजन टाकल्याने तिमांडेंची लढाई एकाकी ठरली.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेनिमित्ताने तिमांडे-कोठारी मनोमिलन होण्याची शक्यता व्यक्त होत होती. परंतु त्यासाठी पुढाकार घेण्याचे मोठे मन तिमांडेंना दाखविता आले नाही. किमान कोठारी यांना सन्मानपूर्वक पवारांच्या सभेत स्थान मिळाले असते तरीही तिमांडेंना मोठा आधार झाला असता. परंतु कार्यकर्त्यांचा पोरकटपणा तिमांडेंना नडला. कुणावार यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली कामे फ ळास आली. बंडखोरी करणारे शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांचा लाजिरवाणा पराभव सेनेची उमेद खचवणारा ठरावा. बंडखोरी करण्याइतपत शिंदे सक्षम नाहीतच, असा विरोधकांचा होरा खरा ठरला. तीनवेळा आमदारकी व काही काळाचे मंत्रीपद भूषवणाऱ्या शिंदेंनी स्वत:सह पक्षाचा पालापाचोळा केला.

आर्वीत भाजपचे दादाराव केचे यांनी विजय प्राप्त करीत आपला तिकिटाचा हट्ट अनाठायी नसल्याचे पक्षनेत्यांना दाखवून दिले. त्यांची लढाई पक्षनेते सुधीर दिवे, राहुल ठाकरे व अविनाश देव यांनीच लढली. काँग्रेसच्या अमर काळे यांचे कच्चे दुवे हेरून या नेत्यांनी केचेंचा विजय सुकर केला.

काँग्रेसच्या काळेंना असलेला विश्वास अनाठायी ठरला. केचे विरोधक होऊच शकत नाही, अशी वल्गना करणाऱ्या काळेंना भाजपचे निवडणूक व्यवस्थापन भारी ठरले. राहुल गांधींची सभाही त्यांना वाचवू शकली नाही. मी म्हणजेच काँग्रेस, असा आविर्भाव सोडावा लागण्याचा धडा या निवडणुकीने काळेंना दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 3:11 am

Web Title: bjp shivsena election result akp 94
Next Stories
1 ‘वंबआ’मुळे काँग्रेस विजयापासून ‘वंचित’
2 अमरावतीत महायुती का गारद झाली?
3 विकासकामांच्या संथगतीमुळे मतदारांचा नकार
Just Now!
X