18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोर्चेबांधणी

परभणी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने शिरकाव केला

प्रतिनिधी, औरंगाबाद/परभणी | Updated: October 7, 2017 5:07 AM

भारतीय जनता पक्ष (प्रतिकात्मक छायाचित्र )

औरंगाबाद, परभणीत लोकसभेची तयारी

औरंगाबाद व परभणी या शिवसेनेचा बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादेत पक्षाचे उत्तर प्रदेशातील एक ज्येष्ठ नेते डॉ. महेंद्र सिंग यांनी गुरुवारी बैठक घेऊन कार्यकर्त्यांचा विचार जाणून घेतला. लोकसभेच्या दृष्टीने तयारी लागण्याच्या सूचना केल्या आहेत. या वेळी स्थानिक पातळीवरील भाजपचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.

परभणी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने शिरकाव केला असून पक्षाने लोकसभेची मोच्रेबांधणीही सुरू केली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्यातला संपर्क वाढवला आहे. जिल्ह्यातल्या पक्षसंघटनेवरही लोणीकरांचे बारकाईने लक्ष आहे. लोणीकरांसह आणखीही अनेक इच्छुक जिल्ह्यात भाजपकडून लोकसभेसाठी निवडणूक लढवण्यास तयार असले, तरीही पक्षाला मात्र उमेदवारी देतांना बारकाईने विचार करावा लागणार आहे.

सध्या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या बठका, कार्यकर्ता मेळावे व विविध उपक्रमांना लोणीकरांची हजेरी आवर्जून लागत आहे. ज्या ठिकाणी स्वत येणे शक्य नाही, अशा ठिकाणी लोणीकर हे आपले चिरंजीव राहुल यांना पाठवत आहेत. एकूणच पक्षाने जर ऐन वेळी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आपले नाव निश्चित केले तर त्याआधी पाश्र्वभूमी तयार असावी म्हणून लोणीकरांची ही गुंतवणूक असल्याचे स्पष्ट आहे. परभणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश, जिल्हा प्रशासनासोबतच्या आढावा बठका यावर सध्या लोणीकरांनी भर दिला आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी तथा उत्तर प्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. महेंद्रसिंह यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली आहे. या बठकीत डॉ. महेंद्रसिंह यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला असून बूथ मजबुतीकरणावर भर देण्यास कार्यकर्त्यांना सांगितले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातल्या सर्व दोन हजारांच्या आसपास असलेल्या बूथचे मजबुतीकरण करण्यात यावे. तसेच या प्रत्येक बूथवर समाजातल्या विविध घटकातले प्रतिनिधी असावेत, केंद्र व राज्य सरकारने ज्या योजना आखल्या आहेत, त्या योजनांची माहिती या वेळी जनतेला देण्यात यावी. परभणी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या पक्ष पदाधिकाऱ्यांसह जालना जिल्ह्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांचे प्रमुख पदाधिकारीही या बठकीला हजर होते. सध्या लोणीकर यांच्यासह परभणी जिल्ह्यातही अनेक इच्छुक लोकसभेसाठी तयार आहेत.

डॉ. महेंद्रसिंह यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर मोठमोठय़ा जाहिराती आणि स्वागतफलक उभारून काही कार्यकर्त्यांनी नेहमीच्याच पारंपरिक पद्धतीने आपला खटाटोप सुरू केला आहे. परभणी दौऱ्यात पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, विभागीय महामंत्री देशमुख, डॉ. प्रफुल्ल पाटील, मेघना बोर्डीकर आदी हजर होते. डॉ. महेंद्रसिंह यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना थेट जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले असले, तरीही यातल्या इच्छुकांनी मात्र लोकसभा डोळ्यासमोर ठेवून आपल्या नेहमीच्याच पद्धतीने मोच्रेबांधणी चालवली आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह कन्या मेघना यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. बोर्डीकर यांचा प्रवेश लोणीकर यांना मान्य नसल्याने बोर्डीकर यांच्या नावाला लोणीकरांकडून अप्रत्यक्ष रीत्या विरोध असल्याचे चित्र आहे. लोणीकरांचा परतूर विधानसभा मतदारसंघ हा परभणी लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळेच लोणीकरांनी परभणीशी संपर्क वाढवला आहे.  महापालिका निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले डॉ. प्रफुल्ल पाटील हे सध्या लोणीकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. डॉ. पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही लोणीकरांनी हजेरी लावली होती. शेतकरी कर्जमाफी योजनेचा कार्यक्रम घेऊन ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभही डॉ. पाटील यांनी मंत्री लोणीकर यांच्या उपस्थितीत केला होता. लोणीकर जर स्वत लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नसतील, तर ते डॉ. पाटील यांच्या नावाची शिफारस करू शकतात. डॉ. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हा कार्याध्यक्ष होते. आणखी काही नावे लोकसभेच्या अनुषंगाने चर्चिली जात असली, तरीही शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्नांची शिकस्त केली जाणार आहे.

First Published on October 7, 2017 5:07 am

Web Title: bjp start evaluation for lok sabha election in aurangabad and parbhani