मेगाभरतीमुळेच भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का लागला या विधानावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यु-टर्न घेतला आहे. त्यांनी या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले आहे. मी जे बोललो त्याचा विपर्यास केला गेला असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन काम करतो. मेगा भरतीचा निर्णय हा कोणा एकटयाचा नाही तो, कोअर कमिटीचा निर्णय होता असे पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्यावेळी तिकीट वाटपामध्ये जुन्या लोकांना डावललं नाही असा त्यांनी दावा केला. बाहेरुन आलेल्या फक्त २७ जणांना तिकिट दिली असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील</strong>
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अन्य पक्षांतील बडय़ा नेत्यांना गळाला लावून संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न भाजपने केला असला तरी या ‘भरतीमुळेच भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का लागला’, असे सांगत भरतीच्या प्रयोगामुळे पक्षाचे नुकसानच झाल्याची अप्रत्यक्ष कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

अशा प्रकारची कबुली देऊन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अन्य पक्षांतील नेत्यांच्या भरतीबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह लावले आहे.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली इतर पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात स्थापन झाले. त्यानंतर विधान परिषदेची आमदारकी आणि इतर पदे देताना निष्ठावंतांना बाजूला ठेवून बाहेरून आलेल्यांना जास्त संधी मिळाल्याने पक्षात अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मेगाभरती सुरू झाली आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत मोठय़ा प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये आले. त्यात राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय, रणजितसिंह मोहिते-पाटील, गणेश नाईक-संदीप नाईक, हर्षवर्धन पाटील, मधुकर आणि वैभव पिचड, पद्मसिंह पाटील-राणा जगजितसिंह आदी अनेकांचा समावेश होता.