News Flash

मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? – भाजपा नेत्याचा सवाल

राज्यात महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व कुठेही दिसत नाही.

महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही, मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतक-यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही, तुम्‍ही जनतेच्‍या मनातून केव्‍हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू नका दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतक-यांचा एल्गार मंत्रालयावर येवून धडकेल असा इशारा माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नगर-मनमाड मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टिका करून सरकार मधील मंत्रीच दूध दरवाढ करण्यास विरोध करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

आणखी वाचा- दूध उत्पादक शेतकरी वाचवायचा असेल, तर अनुदान द्या : चंद्रकांत पाटील

नगर मनमाड रस्त्यावर घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात आसूड ओढण्यात आले. दूध उत्पादकांच्या वतीने मागण्यांचे निवेदन विखे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिले. या आंदोलनात गणेश कारखान्याचे चेअरमन मुंकूदराव सदाफळ, तालुका दूध संघाचे चेअरमन रावसाहेब देशमुख, चेअरमन नंदु राठी, सभापती बापूसाहेब आहेर, सभापती नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे, भाजपाचे तालुका अध्‍यक्ष नंदकुमार जेजूरकर, जेष्‍ठनेते शरद थोरात, अॅड.रघुनाथ बोठे, भाजपाचे शहर अध्‍यक्ष अनिल बोठे, माजी नगराध्‍यक्ष कैलास सदाफळ, दिपक रोहोम, वाल्मिकराव गोर्डे, बाबासाहेब डांगे, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे संचालक संजय आहेर यांच्‍यासह दूध उत्‍पादक शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आणखी वाचा- सांगली : इस्लामपूरमध्ये दुधाच्या गाड्या अडवून गरिबांना दूध वाटप

राज्यात महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व कुठेही दिसत नाही. मुख्यमंत्री मुलाखतीतून शेतक-यांच्या प्रश्नाची थट्टा करी आहेत. कोरोना संकटात शेतक-यांना कोणतीही मदत सरकार करु शकले. राज्यात युरीया खताचा काळा बाजार राजरोसपणे सुरू आहे. सोयाबीन बियाणात शेतक-यांची फसवणूक झाली पण एकाही खासगी कंपनीवर सरकारने गुन्हे दाखल केले नाहीत. दुबार पेरणीसाठी सरकारने शेतक-यांना कोणतीही मदत जाहीर केली नसल्याची टिकाही विखे पाटील यांनी केली. मुख्‍यमंत्री रोज म्‍हणतात सरकार पाडून दाखवा पण सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही तुम्‍ही तर जनतेच्‍या मनातुन केव्‍हाच पडले आहात असा टोलाही त्‍यांनी लगावला.

आणखी वाचा- दूध दरवाढीसाठी ‘रयत क्रांती’कडून राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन सुरू

राज्यातील शेतक-यांनी दुग्ध व्यवसाय अर्थिक संकट सहन करीत जीवापाड जपला आहे. मागील युती सरकारने समिती नेमून अनुदानाचा निर्णय केला. निर्णय प्रक्रियेत असलेले आज राज्यात मंत्री आहेत. मग आता शेतकरी विरोधी भूमिका काॽ आज पशुखाद्याचे दर वाढले आहेत पण १० रुपये तोटा सहन करून शेतकरी दूधधंदा करीत आहेत. शेतक-यांना आघाडी सरकारने २५ रूपये हमीभाव जाहीर केला. पण राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघानी शेतक-यांचे दूध १८ ते १९ रुपयांनी खरेदी करून दूध उत्पादकांची फसवणूक केली आहे. सरकार दूध भुकटीसाठी अनुदान देत असतानाही शेतक-यांना मिळत नाही मग या अनुदानाचे गौडबंगाल काय आहेॽ दूध अनुदानाचा या महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे विखे पाटील यांनी आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 2:25 pm

Web Title: bjp vikhe patil nagar mahavikas aghadi nck 90
Next Stories
1 सांगली : इस्लामपूरमध्ये दुधाच्या गाड्या अडवून गरिबांना दूध वाटप
2 दूध दरवाढीसाठी ‘रयत क्रांती’कडून राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन सुरू
3 गणेशोत्‍सवासाठी कोकणात येताय; १४ दिवस होम क्‍वारंटाइन व्हा
Just Now!
X