भाजपने विविध प्रकारच्या योजना सामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून केलेल्या आहेत. त्यामुळे आगामी २०१९ च्या निवडणुकीत जनतेचा कौल आमच्या बाजूने येऊन या देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच होतील, असा  विश्वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत  व्यक्त केला.

शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री राम शिंदे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संघटन मंत्री विजय पुराणिक, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, आ. स्नेहलता कोल्हे, आ. बाळासाहेब मुरकुटे, साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, रवींद्र गोंदकर आदी उपस्थित होते.

दानवे म्हणाले,की शिवसेनेशी आमची युती व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. सतत प्रयत्नशील असून समविचारी पक्षाने एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळावे आणि याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होऊ  नये, अशी आमची इच्छा आहे.

साधारणत: ३ ते ४ मार्चच्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता अधिसूचना निघू शकते. .तोपर्यंत राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने सज्ज करण्याचे काम सुरु आहे. राज्यात ९२ हजार बूथ असून त्यापैकी ८८ हजार बूथवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलेले आहे.  शिर्डी शिवसेनेचा मतदार संघ आहे, पण आम्ही दौरा केला, पक्षाची बैठक घेतली. आमची अजूनही युती तुटलेली नाही. शेवटी युती होईल का नाही हे आम्ही बैठकीत ठरवू, गेली पंचवीस वर्ष आम्ही एकत्र लढत आहोत. आगामी निवडणुका विकासाच्या मुद्यावर लढवणार आहोत असे  त्यांनी सांगितले.