“राज्य सरकारचा मराठा समाजाप्रति असलेला द्वेष सारखा दिसून येत आहे. सरकार पुन्हा पुन्हा मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात करत आहे. यांचे सर्वच निर्णय मराठा समाजासाठी धक्कादायक ठरत आहेत. सर्व संघटनांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला, तर भाजपा या आंदोलनाचं नेतृत्व करण्यास तयार आहे.” असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

तसेच, ९ सप्टेंबरपासून आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. तिघांमधील वादामुळे मराठा आरक्षणाचं मातेरं झालं आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थांबाबत राज्य सरकारने पुन्हा एकदा कसलेही नियोजन न करता चुकीचा निर्णय घेऊन त्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर केला आहे.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, “राज्य सरकारने मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचं मातेरं केलेलं आहे. मराठा समाजाला आता एमएसइबीमध्ये नोकऱ्यासाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज करावे लागतील, असा गोंधळ राज्य सरकारने करून ठेवला आहे. नितीन राऊत यांनी शिक्षणातलं एसईबीसीचं १२ टक्के आरक्षण आहे ते देखील रद्द करून टाकलं आहे. यांचे मनमानी निर्णय मराठा समाजासाठी धक्कादायक आहेत. मराठा समाजासाठी योग्य कार्यवाही यांना करता आली नाही. मराठा आरक्षणासाठी घटनातज्ज्ञांसोबत आणि चिंतन करणाऱ्यांसोबत या राज्य सरकारने कोणताही समन्वय साधला नाही.”

मराठ्यांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच कपटी राहिला आहे ! – चंद्रकांत पाटील

तसेच, “मराठा समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर ही सुपर न्यूमरीकल कन्सेप्ट जी अनेकदा व्यवहारात आणली गेली आहे ती तुम्ही का लागू करत नाही? यांनी मराठा समाजाला असंच गृहीत धरलं आहे की, भांडून भांडून हे आणखी किती भांडणार आहेत. मी राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करतो आणि याबाबत चिंता व्यक्त करतो की, एसईबीसीमध्ये १२ टक्के शिक्षणाचं आरक्षण रद्द केल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होईल.” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठा विद्यार्थ्यांला आर्थिक दुर्बल गटातून प्रवेश

“मराठा समाजाच्या हितासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन जर हा निर्णय घेतला की, भाजपा या आंदोलनाचं नेतृत्व करेल, तर भाजपा त्यासाठी तयार आहे.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.