भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पक्षांतर्गत विरोधक अशी प्रतिमा असणाऱ्या नेत्यांना घेरायचे वा मारायचे, या भूमिकेतून कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक होऊन बुधवारी अंत्यसंस्काराच्या वेळी दगडफेक झाल्याचे आता पुढे आले आहे. नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे मुंडे यांचे पक्षांतर्गत विरोधक असल्याची मुंडेसमर्थकांची भावनाच या घटनेला कारणीभूत ठरली आणि त्यातूनच गडकरी यांच्या मोटारीवरही दगडफेक झाली तसेच फडणवीस यांनाही कार्यकर्त्यांनी घेरले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही यास दुजोरा दिला.
अंत्यसंस्काराच्या वेळी गडकरी यांच्या विरोधात प्रत्येकजण बोलत होता. मुंडे यांचा अपघात हा घातपात असावा, हा संशय त्यांना होणाऱ्या पक्षांतर्गत विरोधातून बळावल्याचे चित्र होते. जमावाचा संताप एवढा तीव्र होता की, राजनाथसिंह, सुषमा स्वराज व लालकृष्ण अडवाणी यांच्या बचावासाठी पोलिसांना प्लास्टिकची खुर्ची उपडी ठेवावी लागली. गडकरी हे मुंडे यांचे पक्षांतर्गत विरोधक हा संदेश ऊसतोड कामगारांपर्यंत गेल्याने त्यांच्या तोंडी त्यांच्या निषेधाच्या घोषणा होत्या.
अंत्यविधीस जमणारे कार्यकत्रे अस्वस्थ आहेत, याची जाणीव पोलिसांना सकाळीच आली होती. मात्र, आमदार पंकजा पालवे यांच्या आवाहनानंतर आणि मंत्राग्नी दिल्यावर हा राग शांत होईल, असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. परत जाण्याच्या वेळी पुन्हा जमाव संतप्त झाला, तेव्हा सर्व राजकीय विरोधकांना गाठून त्यांना घेरायचे, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता झाली होती. त्यात पक्षांतर्गत विरोधकांनाही कार्यकर्त्यांनी पद्धतशीर लक्ष्य केल्याचे चित्र दिसून आले.
विशेष म्हणजे ‘सत्य काय ते बाहेर यावे,’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र पंतप्रधान मोदी यांना पाठविले आहे. फडणवीस यांनीही तशी मागणी केली आहे.
नितीन गडकरी यांनी मात्र सीबीआय चौकशीचा निर्णय मोदीच घेतील, मात्र लोकांच्या मनात अपघाताबाबत काही शंका असतील तर त्याचे निरसन व्हायला हवे, असेही गडकरी यांनी नमूद केले आहे.

कथित मुंडे विरोधकांवर मुंडे समर्थकांचा रोष होता. नितीन गडकरी यांच्या गाडीवर दगडफेक झाली, हे खरे आहे, मात्र मला कार्यकर्त्यांनी घेरले नाही. माझे व मुंडे यांचे संबंध कसे होते, हे बीड जिल्ह्य़ाला माहीत आहे, त्यामुळे मला कार्यकर्त्यांनी गाडीपर्यंत पोहोचता यावे, यासाठी मदत केली.
देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष