18 February 2019

News Flash

मोबाइल काढून घेतल्याने मुलगा घरातून बेपत्ता

बार्शी शहरात घडलेल्या या घटनेची नोंद बार्शी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

सोलापूर : घरात अभ्यासाकडे दुर्लक्ष करून सतत मोबाइलवर गेम खेळत बसणाऱ्या मुलाला शिक्षक वडिलांनी रागावल्याचा राग मनात धरून मुलगा घरातून निघून गेला. गेल्या सहा दिवसांपासून त्याचा शोध लागत नसल्याने त्याचे आई-वडील चिंतेत आहेत. बार्शी शहरात घडलेल्या या घटनेची नोंद बार्शी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

प्रदीप शिवराज खराडे (वय १९) असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचे वडील शिवराज विठोबा खराडे हे खामकरवाडीतील शाळेत शिक्षक आहेत. मुलगा प्रदीप हा घरात सतत मोबाइलवर गेम खेळत असतो. त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्षच असते म्हणून त्याला आई-वडील रागावत असत. सायंकाळी वडील शाळेतून घरात परतले तेव्हा त्यांना मुलगा प्रदीप हा अभ्यास न करता मोबाइल घेऊन गेम खेळत बसलेल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे रागावलेल्या वडिलांनी त्याच्या हातातून मोबाइल संच काढून घेतला आणि अभ्यासाकडे लक्ष दे म्हणून कडक शब्दात सुनावले. तेव्हा मुलगा प्रदीप यास हा अपमान वाटला. तो ताडकन उठून घरातून बाहेर पडला. गावात शोध घेतल्यानंतर तासाभरात तो सापडला. त्याला समजावत आई-वडील आपल्या घराकडे घेऊन येत होते. मात्र अचानकपणे त्याने आई-वडिलांना चकवा देत पुन्हा पळ काढला. गेल्या सहा दिवसांपासून त्याचा शोध लागत नाही. बार्शी शहर पोलीस ठाण्यात मुलगा प्रदीप हा बेपत्ता झाल्याची तक्रार वडील शिवराज खराडे यांनी नोंदविली आहे.

First Published on September 6, 2018 2:19 am

Web Title: boy missing from house after mobile taken by parent