दीड वर्षांत लाचखोरीचे १७ गुन्हे; अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक घटना

निखिल मेस्त्री, पालघर

पाच वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्य़ातील भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. सरकारी आकडेवारीनुसार लाच घेण्याच्या प्रमाणात पालघर जिल्हा कोकण विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात जिल्ह्य़ात लाचलुचपतीचे १७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पालघर जिल्ह्यात २०१८मध्ये विविध आस्थापनांतील १२ सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. २०१९च्या चार महिन्यांत पाच जणांवर अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले. जिल्ह्य़ातील शासकीय कार्यालयातून लाच मागण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. कोकण विभागातील पालघर जिल्ह्यातील ही आकडेवारी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्र अखत्यारीत असलेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांच्या तुलनेत पालघरमध्ये लाचेत पकडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी अधिक असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीवरून दिसून येते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या कोकण विभागात २०१८मध्ये लाचखोरीची ३६ प्रकरणे उघडकीस आली. त्यात ठाणे परिक्षेत्रात १२, पालघरमध्ये १२, नवी मुंबई ३, रायगडमध्ये २, रत्नागिरीत २ आणि सिंधुदुर्गमध्ये ५ गुन्हे उघकीस आले. २०१९च्या एप्रिल महिन्यापर्यंत लाचखोरीचे ३३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ठाण्यात १८, पालघरमध्ये ५, नवी मुंबईत ३, रायगडमध्ये २, रत्नागिरीत ३ आणि सिंधुदुर्गमध्ये २ गुन्ह्य़ांचा समावेश आहे.

लाचखोरीचे प्रमाण वाढले असले तरी लोकांमध्ये झालेल्या जनजागृतीमुळे आणि त्यांनी केलेल्या तक्रारींमुळे लाचखोरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत. त्यामुळे या कारवाया शक्य होत आहेत.

– अजय आफळे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग, पालघर