वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात महाबळेश्वरहून पुण्याकडे जाणाऱ्या लक्झरी बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. बस पलटी झाल्यानंतर रस्त्यावरून घसरत जाऊन महाबळेश्वरकडे जाणाऱ्या शिवशाही बसवर आदळली. यामध्ये दोन्ही बस मधील ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वाई ,पाचगणी, सातारा व पुणे येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस चौकी नजीक राहणाऱ्या पवार कुटुंबियांच्या मुलीचे शिरूर येथील मेनगवडे यांच्या मुलाशी रविवारी महाबळेश्वर येथे लग्न होते. लग्न झाल्यावर शिरूरची बस रवाना झाल्यावर पुण्याची बस दुपारी बाराच्या दरम्यान वऱ्हाडी घेऊन रवाना झाली. पसरणी घाटात नागेवाडी स्टॉप जवळ आल्यावर दुपारी एकच्या दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यातच उलटून आडवी झाली व पन्नास फूट घसरत पुढे जात असताना वाईहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या मुंबई महाबळेश्वर शिवशाही बसवर जाऊन जोरदार आदळली.

यामध्ये दोनही बस मधील ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही माहिती वाई व पाचगणी पोलीस प्रशासनाला समजताच पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. वाई व पाचगणी येथून रुग्णवाहिका दाखल झाल्या. जखमींना ताबडतोबीने पाचगणी,वाई ,सातारा येथे तर गंभीर जखमींस पुण्याला हलविण्यात आले आहे.

यावेळी पुण्याच्या बस मध्ये ४५ तर शिवशाही बस मध्ये २५ प्रवासी प्रवास करत होते. दैव बलवत्तर म्हणूनच मोठी जीवित हानी झाली नाही. अन्यथा समोरून शिवशाही बस येत नसती तर लक्झरी बस संरक्षक कठडा तोडून खोल दरीत कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती. या अपघातामुळे वाई महाबळेश्वर रस्ता दुपारी चार पर्यंत बंद होता. वाई व पाचगणी बाजूला पसरणी घाटात वाहतूक कोंडी झाली होती.

अपघात झाला त्यावेळी वाई पंचायत समितीच्या सभागृहात मांढरदेव यात्रेच्या नियोजनाची बैठक सुरु होती यामुळे सर्व यंत्रणा राबविणे सोयीचे झाले. वाई पाचगणी परिसरातील अनेक कार्यकर्त्यांची व पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी मदत झाली त्यामुळे जखमींना लगेचच मदत मिळू शकली. बघ्यानी मोठी गर्दी केली होती. पोलीस उपअधीक्षक अजित टिके,पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे,सहायक निरीक्षक विकास बडवे,आशिष कांबळे,उप निरीक्षक राजेंद्र कदम,संजय मोतेवार यांनी उपस्तीथ राहून गाड्या काढणे ,वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus accident in satara sgy
First published on: 09-12-2019 at 14:50 IST