21 January 2021

News Flash

लाखो रुपये खर्चूनही बस स्थानके अस्वच्छच

स्वच्छतेच्या कामांसाठी कोटय़वधींचा ठेका दिला गेल्याची माहिती महामंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

धुळे बस स्थानक परिसरात अनेकदा असे चित्र दिसते.

संतोष मासोळे, धुळे

महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गतवर्षी महामंडळातील बस स्थानक, कार्यालय, बसगाडय़ा स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या या संकल्पाला स्वच्छता ठेकेदार आणि महामंडळातील काही अधिकारी हरताळ फासण्याचे काम करीत असल्याचे भयावह चित्र आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्रातील सर्व एसटी आगार, स्थानके, विभागीय कार्यालये, कार्यशाळांची स्वच्छता करण्याचे काम एकाच कंपनीला दिले गेले. वर्षभरात प्रातिनिधिक स्वरुपात धुळे आगार बस स्थानकांचे मूल्यमापन केल्यास तो उद्देशच सफल होत नसल्याचे दिसून येते. बस स्थानकांमध्ये अस्वच्छता कायम असताना या कामावरील खर्चात मात्र चारपट वाढ झाल्याने महामंडळाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

स्वच्छतेच्या कामांसाठी कोटय़वधींचा ठेका दिला गेल्याची माहिती महामंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. ज्या स्वच्छतेच्या भावनेने हे काम देण्यात आले, त्या भावनेला वर्षभरात मुरड घातली गेल्याचे दिसून येते. पूर्वी एक ते दीड लाखांत धुळे विभागाची म्हणजेच धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील आगार, अन्य स्थानके, कार्यालयांची स्वच्छता होत होती. त्यात आता चारपट वाढ होऊनही अस्वच्छता कायम असल्याच्या तक्रारी आहेत. धुळे आगार आणि बसस्थानकातील विदारक अवस्था पाहिल्यास राज्यातील इतर आगारांतील स्वच्छतेची काय स्थिती असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. पूर्वी अशा पध्दतीने संपूर्ण राज्यभरात एकाच कंपनीला काम देण्याची पद्धत नव्हती. हे काम त्या त्या जिल्ह्यापुरते किंवा विभागापुरते दिले जात असे. तसेच हे काम देताना आधी आगार पातळीवर कामाचे मूल्यमापन करून सेवाभावी संस्थेला ठेका दिला जात होता. दरमहा २० ते ३० हजार रुपयांदरम्यान बस स्थानक परिसरातील कामांनुसार हे काम दिले जात असे. तो देताना करार, अटी-शर्तीनुसार काम न झाल्यास कामांच्या दर्जानुसार गुण देऊन त्या गुणांनुसार ठेकेदाराला देयके दिली जात होती. कामात अनियमितता असल्यास देयकांमधून काही रक्कम कपात व्हायची. मात्र आता जो करार झाला, त्याविषयी एकाही स्थानिक अधिकाऱ्याला पूर्ण कल्पना नसल्याची शंका आहे. कारण, ठेकेदाराने काय काम करायचे, त्याने केलेल्या कामाचे मूल्यमापन कोण करणार, ठेकेदार कोणाला जबाबदार असणार, या सर्व बाबी गुलदस्त्यात आहेत.

बस स्थानक आणि तेथील परिसर किती वेळा स्वच्छ करायचा, चालक-वाहक विश्रांती गृह किती वेळा स्वच्छ व्हायला हवा, तसेच निर्माण होणारा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय निर्देश दिले आहेत, याची माहिती अधिकाऱ्यांकडे नाही. स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. आगार पातळीवर अधिकाऱ्याने मध्यवर्ती कार्यालयात तक्रार केली तर तिची दखल घेतली जात नाही. उलट अधिकाऱ्यास खडे बोल सुनावले जातात. अयोग्य कामामुळे विभाग नियंत्रकानी ठेकेदाराचे देयक रोखून ठेवले तर मध्यवर्ती कार्यालयाकडून ते त्वरित अदा करण्याचे आदेश होतात. यामुळे स्थानिक पातळीवर ठेकेदाराची मनमानी सुरू असल्याची भावना खुद्द एसटीचे कर्मचारी व्यक्त करतात.

मूळ ठेकेदाराने राज्यात उपठेकेदार नेमले आहेत. संबंधितांकडून कामगार कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी काही सांगता येणार नसल्याचे उत्तर दिले. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील यांच्याशीही दोन वेळा भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

राज्यातील २५८ आगारांचे काय?

संपूर्ण महाराष्ट्रात ३० विभाग, २५८ आगार, तीन मुख्य कार्यशाळा आणि एक मुख्य कार्यालय आहे. या सर्वच ठिकाणच्या साफसफाईची कामे एका कंत्राटदाराकडून केली जातात. एका विभागातील कामांचा आढावा घेतला तरी हे काम कोणत्या धाटणीने सुरू आहे ते लक्षात येते. धुळे विभागात धुळे-नंदुरबार मिळून नऊ आगार, एक विभागीय कार्यालय आणि एका कार्यशाळेचा समावेश आहे. धुळे आगारात बस स्थानक परिसरात दोन सत्रात १० कामगार काम करतात. पूर्वी धुळे आगारात दरमहा २५ हजार रपये स्वच्छतेवर खर्च होत होता. आज एकाच कंपनीला ठेका दिल्याने त्याचा खर्च साधारणत: साडेतीन ते चार लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पूर्वी महिनाभराच्या स्वच्छतेच्या कामाचे एक ते दोन लाख रुपये देयक होते. आता चार लाखात एकाच आगाराची स्वच्छता होते.

धुळे येथील स्वच्छता दर

बस स्थानक मोकळा परिसर १४ रुपये प्रति चौरस मीटर, इमारत परिसर २० रुपये प्रति चौरस मीटर, बसस्थानक बंदिस्त परिसर ५४ रुपये प्रति चौरस मीटर असे दर निश्चित करण्यात आला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कामाच्या देयकापोटी तीन लाख ४४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2018 1:01 am

Web Title: bus stop unclean after spending millions of rupees
Next Stories
1 एसटीच्या विनावातानुकूलित ‘स्लीपर बस’ची प्रतीक्षा
2 निरुपमला परत कुत्रा चावला किंवा निरुपम कुत्र्याला चावला…निलेश राणेंची संजय निरुपमांवर टीका
3 फक्त दीड तास बंद राहणार तुळजाभवानी मंदिराचे दरवाजे
Just Now!
X