रमेश पाटील

करोनाच्या महासाथीने अनेक व्यवसाय व उद्योग डबघाईला गेले असतानाच शेतकऱ्यांसाठी भाताचे भारे बांधण्यासाठी  लागणारे बंध (बांबूपासून तयार केलेला दोर) खरेदीकडेदेखील शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने आदिवासी भागातील बंध व्यावसायिक अडचणीत आले आहेत. भारे बांधण्यासाठी शेतकरी स्वस्तात मिळत असलेल्या कापडी पट्टय़ांचा उपयोग करीत असल्याने बंधांची विक्री होत नसल्याने आदिवासींसाठी दोन महिने चालणाऱ्या या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

भात पिकाची कापणी केल्यानंतर या भात पिकाचे भारे बांधण्यासाठी शेतकऱ्याना पाचशे ते दोन हजार नगापर्यंत बंधाची गरज भासत असते. ग्रामीण भागातील आदिवासी बांधव जंगलातील लहान बांबूपासुन हे बंध बनवितात. या बंधचा उपयोग शेतकरी भात पिकाचे भारे बांधण्यासाठी करीत असतो. वाडा तालुक्यातील परळी, ओगदा, उज्जेनी, आखाडा या भागांतील शेकडो आदिवासी महिला व पुरुष  बंध विक्रीचा दरवर्षी  सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत हा व्यवसाय करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून येथील अनेकांना चांगला रोजगार मिळत असतो.

या वर्षी शेतीवर परतीच्या पावसाचे आलेले संकट तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भात पिकाची कमी केलेली लागवड याचा परिणाम झालेला आहेच, पण सर्वाधिक परिणाम हा सध्या भाताचे भारे बांधण्यासाठी कापडी पट्टय़ांचा मोठय़ा प्रमाणावर केला जाणाऱ्या वापरामुळे बंध व्यवसायच धोक्यात आला आहे.

बंध तयार करण्याची पद्धत

दोन ते तीन दिवसांपूर्वीच तोडलेल्या ओल्या बांबूचे ५ ते ६ फूट लांबीच्या अंतरावर तुकडे केले जातात.  हे तुकडे दगडावर ठेचून ३ ते ४  दिवस सुकविले जातात आणि शंभर बंधांचा गठ्ठा करून प्रति शेकडा (१०० नग) दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत बाजारात विकायला आणले जातात.

आर्थिक संकट

दिवाळी सणासुदीच्या काळात होणाऱ्या या व्यवसायातून शेकडो कुटुंबातील सदस्यांची दिवाळी आनंदात जात होती. मात्र या व्यवसायावर करोनाचे व कापडी पट्टय़ांच्या आलेल्या संकटामुळे हा व्यवसाय बंद करण्याची वेळ या आदिवासी कुटुंबांवर आली आहे.

दोन महिने चालणाऱ्या या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आमची चूल पेटत होती. मात्र सध्या हा व्यवसायच बंद करण्याची वेळ आली आहे.

– महादू भुजाडे, बंध व्यावसायिक, आखाडा, ता. वाडा.