वाहतूक कोंडी टळणार; १०० कोटींचा प्रस्ताव लवकरच केंद्राकडे

नीरज राऊत, निखिल मेस्त्री, पालघर

पालघर मुख्यालयाकडे पोहोचताना मनोर गावातून प्रवास करणाऱ्या वाहनांना अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी मनोर गावाला बाह्य़वळण रस्ता (बायपास) करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नेटाळीहून राष्ट्रीय महामार्गावर साये या गावी जोडणारा बाह्य़वळण रस्ता तयार केला जाणार आहे. सुमारे पावणे तीनशे कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) विभागाकडे लवकरच सादर करण्यात येणार आहे.

मनोर गावांमध्ये अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीला अनेकदा सामोरे जावे लागत असल्याने पालघर, माहीम, केळवे या भागाकडे येणाऱ्या वाहनांना तसेच जिल्हा मुख्यालयातून ये-जा करणाऱ्या वाहनांना विलंब होत असे. मनोर येथील रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तरीही पालघर शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या पाहता मनोर गावाला बाह्य़वळण रस्ता तयार करण्याचा आणि तो राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग अनेक वर्षांपासून विचार करीत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने नेटाळी या गावापासून राष्ट्रीय महामार्गावर साये या गावाला जोडणारा नवीन रस्ता प्रस्तावित केला आहे. सुमारे तीन किलोमीटरच्या या रस्त्यामुळे १२ किलोमीटरचा वळसा आणि सुमारे वीस मिनिटांच्या अवधीची बचत होणे अपेक्षित आहे.

या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर १२० मीटर लांबीचा वैतरणा नदीवरील पूल उभारणे प्रस्तावात उल्लेख आहे. या रस्त्यासाठी लागणारा निधी केंद्रीय मार्ग निधी सेंट्रल रोड फंडातून उपलब्ध व्हावा, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे.

बोईसरहून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून कुकडे, रावते-बऱ्हाणपूर मार्गे रस्ता जोडण्यासाठी सूर्या नदीवर नव्याने पूल बांधणे अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कुकडे आणि रावते या गावांत एक किलोमीटरचा नवीन रस्ता आणि त्यासोबत १२० मीटर लांबीचा नवीन पूल प्रस्तावित केला आहे. यासाठी ४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीत दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असून या वाहनांना हा पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ  शकेल. तसेच रावते व बऱ्हाणपूर गावातील रहिवाशांना बोईसर येथे येण्यास १२ किलोमीटरचे अंतर कमी होण्याचे अपेक्षित आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेले प्रस्ताव केंद्रीय मार्ग निधी विभागाकडे लवकरात लवकर सादर करू, तसेच म्हारंबळपाडा ते दातिवरे-टेम्बीखोडावे या दरम्यान वैतरणा नदीवरील पाच किमी. आणि३१० कोटी खर्चाच्या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले.

अंतर मिटणार..

* तारापूर अणुशक्ती केंद्रात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्यास सोयीचे व्हावे यासाठी मुरबे-खारेकुरण (६५ कोटी) तसेच नवापूर-दांडी या गावांदरम्यान ५७ कोटी रुपये खर्चून पूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. मुरबे आणि खारेकुरण या गावांदरम्यान खाडीवर एक किलोमीटर लांबीच्या रस्ता बांधून त्यावर २०० मीटर लांबीचा पूल प्रस्तावित आहे. या रस्त्यामुळे मुरबे येथून पालघरला जाण्यासाठी लागणारा १७ किलोमीटरचा वळसा कमी होणार आहे.

*  नवापूर ते दांडी या एक किलोमीटरच्या प्रस्तावित रस्त्यावर दीडशे मीटर लांबीच्या नवीन पूल बांधणे अपेक्षित असून यामुळे या दोन गावांमधील संपर्काचे अंतर १४ किलोमीटरने कमी होणे अपेक्षित आहे.