बार्शीतील प्रकार, महिलेसह दोघांवर गुन्हा

मुंबईचा एकेकाळचा अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहीम याच्या नावाने सोलापूर ग्रामीण पोलिसांना फोन करून सोलापुरात जोडभावी पेठेत बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती देऊन दहशत निर्माण करणाऱ्या बार्शीतील एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितासह एका महिलेलाही आरोपी करण्यात आले आहे. केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने खोडसाळपणाने हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले.

हणमंतु वाघमारे (रा. जयशंकर दाळ मिलसमोर, बार्शी) याच्यासह सुवर्णा  मिरगणे (रा. पंकजनगर, बार्शी) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यांपैकी वाघमारे यास अटक करण्यात आली आहे. पहाटे सोलापूर ग्रामीण पोलिसांना एका भ्रमणध्वनीद्वारे फोन करण्यात आला होता. पलीकडील व्यक्तीने, आपण दाऊद इब्राहीम कासकर बोलत असून, सोलापुरातील जोडभावी पेठेत आज बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर फोन लगेचच बंद झाला. रात्री पोलिसांनी गंभीर दखल घेऊन सोलापूर शहर पोलिसांशी संपर्क साधून जोडभावी पेठेत बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती देणारा भ्रमणध्वनी आल्याचे कळविले. त्यानुसार सोलापूर शहर पोलिसांनीही जोडभावी पेठ भाग पिंजून काढला. परंतु बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती खोटी निघाली. संशयास्पद असे काहीच आढळून आले नसल्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांना ज्या भ्रमणध्वनीद्वारे फोन आला होता, त्या भ्रमणध्वनीच्या क्रमांकाची माहिती घेण्यात आली. यात संबंधित भ्रमणध्वनीवरील क्रमांकाची सीमकार्डधारक व्यक्ती सुवर्णा रविकांत मिरगणे ही असल्याचे आढळून आले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तीन महिन्यांपासून सुवर्णा मिरगणे हिने आपले सीमकार्ड हणमंतु खंडू वाघमारे यास वापरण्यासाठी दिल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी हणमंतु वाघमारे याचा शोध घेतला असता त्याने स्वत: पोलिसांना खोटी माहिती देणारा फोन केला होता, अशी कबुली दिली. पोलीस आणि नागरिकांत भीती निर्माण करण्यासाठी खोटेपणाने दाऊद इब्राहीमच्या नावाने खोटा फोन केल्याची कबुली वाघमारे याने दिली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. तसेच स्वत:चा सीमकार्ड स्वत: वापरणे कायद्याने बंधनकारक असताना तो दुसऱ्याला अनाधिकाराने दिल्याबद्दल सुवर्णा मिरगणे हिलाही या गुन्ह्य़ात आरोपी करण्यात आले आहे.