चंद्रपूर जिल्हयात: भरधाव कारची झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीसह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण सोलूपर येथील आहेत. गडचिरोलीत नक्षलविरोधी मोहीमेत तैनात पोलीस उपनिरीक्षक पतीला भेटायला जात असताना हा अपघात झाला आहे.

ही घटना मूल-चंद्रपूर मार्गावरील केसलाघाट येथे मंगळवारी दुपारी ३.३० वाजता  घडली. यात आकांक्षा सचिन माळी (वय २८) आणि पवन नन्नावरे (वय २८) या दोघांचा उपचाराला नेहत असताना मृत्यू झाला. या भीषण अपघातात कारमधील अन्य तीन जण गंभीररित्या जखमी झाले. घटनेची माहिती होताच परिसरातील लोकांनी धाव घेतली. लगेच रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. अंश सचिन माळी (२), सागर सूर्यकांत शिंदे (२८), नितीन वाढई (२५) अशी जखमींची नावे आहेत.

सचिन माळी हे गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानात कार्यरत आहेत. त्यांची पत्नी आकांक्षा सचिन माळी भावासह सोलापूरहुन गडचिरोलीला कारने येत असताना हा अपघात झाला आहे.