जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून मदतीचे वाटप सुरू करावे, गारपिटीच्या अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत कर्जासाठी अडवणूक करणाऱ्या बँकांविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार संजय जाधव यांनी दिला. आठवडाभरात दुष्काळ जाहीर न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व परभणी शहरातील विविध मागण्यांसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी खासदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली बलगाडी मोर्चा नेला. शनिवार बाजार येथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळील मदानात त्याचे सभेत रुपांतर झाले. आमदार मीरा रेंगे, सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. संजय कच्छवे, डॉ. राहुल पाटील, अजित वरपुडकर आदी उपस्थित होते. मोर्चात शेतकरी बलगाडय़ांसह मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मुख्य रस्त्याने मोर्चा आल्यानंतर सर्व बलगाडय़ांनी लक्ष वेधून घेतले. खासदार जाधव हे शेतकऱ्याच्या पारंपरिक वेषात धोती व फेटा घालून सहभागी झाले होते.
जाधव यांनी दुष्काळी स्थितीत शेतकरी त्रस्त असताना बँकेत कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. यापुढे अशी अडवणूक झाल्यास त्याचा उद्रेक पाहायला मिळेल, असा इशारा दिला. फेब्रुवारी-मार्चमध्ये गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, मदतवाटपात शेतकऱ्यांवर अन्याय झाला. अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. नावावर सात-बारा नाही अशांना लाखोंची मदत देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा गरफायदा घेत त्यांच्या नजरेआड अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चालवलेली मनमानी खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या तलाठी, मंडळ व कृषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही जाधव यांनी केली.
इतर कृषी विद्यापीठांमध्ये प्रकल्पग्रस्तांना एक व परभणी कृषी विद्यापीठात वेगळा न्याय का, असा सवाल करून परभणी विद्यापीठातील भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याची मागणीही त्यांनी केली. धनगर समाज आरक्षणासंदर्भात लोकसभेत आवाज उठविला जाईल, असेही जाधव म्हणाले. धार रस्त्यावरील कत्तलखाना १८ पर्यंत स्थलांतरित न झाल्यास दि. १९ ला महापौर, नगरसेवकांच्या दारात कत्तलखान्यातील घाण आणून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला.
डॉ. दळणर, आमदार रेंगे, गंगाप्रसाद आणेराव आदींची भाषणे झाली. डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले. मोर्चानंतर खासदार जाधव यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दुष्काळाबाबत उपाययोजना तातडीने हाती घेतल्या जातील, असे ते म्हणाले. धार रस्त्यावरील कत्तलखाना आठवडय़ात हलविण्याबाबत सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.