एका महिन्यात पाच जणांचा बुडून मृत्यू

वसई : करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व धोकादायक ठरत असलेल्या धबधबे, तलाव, धरणे ,समुद्र किनारे आदी ठिकाणच्या  पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने  बंदी घातली होती. परंतु ही बंदी झुगारून मोठय़ा संख्येने पर्यटक पर्यटनास येत असल्याने पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. महिनाभरात वसईत पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

वसईतील  विविध ठिकाणच्या भागात छोटे मोठे धबधबे , समुद्र किनारे आहेत.  दरवर्षी मान्सूनला सुरुवात होताच मोठय़ा संख्येने पर्यटक पर्यटनासाठी जात असतात. परंतु करोना महामारीचे संकट असल्याने बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही वसई विरार , मुंबई, ठाणे, कल्याण यासह इतर या परिसरातून मोठय़ा प्रमाणात पर्यटक वसई—विरारमध्ये पर्यटनासाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पर्यटनबंदी असतानाही अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये १७ ऑगस्ट  रोजी चिंचोटी धबधबा येथे पर्यटनास गेलेला तरुण बुडाला होता, तर गोखिवरे येथील तरुण सायकलिंग करण्यासाठी गेला होता त्यावेळी राजावळी येथील खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. सप्टेंबर महिन्याची सुरवात होताच पहिल्याच आठवडय़ात सुरूच्या बाग परिसरात पाच ते सहा तरुणांचा गट पिकनिकसाठी गेला असता त्यातील एक तरुण समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला तर पाच जणांचे प्राण जीवरक्षकांनी वाचविले होते. त्यानंतर  विरार कुंभारपाडा येथील तलावात  जोगेश्वरी मुंबई येथील दोन तरुण सेल्फीच्या नादात बुडाले होते. वसईत सातत्याने पर्यटनबंदी काळात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त होऊ  लागली आहे. पोलीस व महापालिका प्रशासनाची नजर चुकवून वसईतील पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा सुट्टीच्या दिवशी राजरोस वावर दिसून येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग प्रतिबंध नियम धाब्यावर बसविले आहेत.

कधी घडल्या घटना ?

* १७ ऑगस्ट रोजी राजावळी खदाण व चिंचोटी धबधबा येथे २ तरुणांचा मृत्यू.

* ६ सप्टेंबर रोजी वसईतील सुरुची बाग समुद्रकिनाऱ्यावर  एक तरुण बुडाला तर पाच जणांचे प्राण वाचविले.

* १३ सप्टेंबर रोजी विरार येथील तलावात मुंबई जोगेश्वरी येथील दोन तरुण सेल्फीच्या नादात बुडाले.