रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील जाकादेवी येथील सेंट्रल बँकेच्या शाखेवर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यांना प्रतिकार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने एक जण ठार तर एक कर्मचारी जबर जखमी झाला. गोळीबारानंतर दरोडेखोर बँकेतील लाखो रुपये घेऊन पसार झाले. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील जाखादेवी येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. अत्यंत गजबजलेल्या भरवस्तीत ही शाखा गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे बँकेच्या कामकाजाला सुरुवात झाली. दुपारी एकच्या  सुमारास पाचजण बँकेत शिरले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून बँकेच्या सर्व कर्मचारी व ग्राहकांना आरडाओरड न करण्याची सूचना केली आणि कॅशियरकडून तिजोरीच्या चाव्या मागून त्यात असलेली लाखो रुपयांची रक्कम आपल्या बॅगेत भरली.
या वेळी दरोडेखोरांना प्रतिकार करण्यास पुढे सरसावलेल्या संतोष चव्हाण या बँकेच्या शिपायावर गोळीबार केला व त्यात तो जागीच ठार झाला; तर सुरेंद्र गुरव हा दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात जबर जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोर एका पांढऱ्या रंगाच्या इलेन्ट्रा कारमधून दाई-भातगावमार्गे फरार झाले. दरोडय़ाचे वृत्त समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रत्नागिरीत सुरू असलेल्या ४०व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलेले विशेष पो. महानिरीक्षक डॉ. सुखविंदर सिंह यांनीही उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपता घेऊन घटनास्थळाला भेट दिली. पोलीस अधीक्षक डॉ. दीपक पाण्डेय, अपर पो. अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्ही. के. शिंदे तपास करीत आहेत.