कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात सध्या पुराने हाहाकार माजवला असून केंद्र सरकारकडून तत्परतने मदत केली जाईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्नीवद्वारे अमित शाह यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात आहे. या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून तत्परतने मदत केली जाईल असं अमित शाह यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचंही अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांनी सागितलं आहे.

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात पोहोचले आहेत. दरम्यान, पुरामुळे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच आवश्यक त्या वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले. गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

कर्नाटकातील आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये वाढलेली पुराच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची विनंती फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांना केली आहे. त्यानुसार आलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्याचे येडीयुरप्पा यांनी मान्य केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांना दिली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), भारतीय हवाई दल, नौदल, कोस्टल गार्ड आदी संस्थांचे चमू कार्यरत आहेत. कोल्हापूर परिसरात एकूण 22 मदत पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरफ-5, नेव्ही-14, कोस्टगार्ड-1, आर्मी कॉलम -1, एसडीआरएफ-1 आदींचा समावेश आहे. तसेच सांगलीमध्ये एकूण 11 पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरएफ-8, कोस्टगार्ड-2 आणि आर्मी-1 आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मदतकार्यासाठी आणखी पथके मागविण्यात आली असून पाच पथके पुण्यापर्यंत पोहोचली असून कोल्हापूर व सांगलीकडे येण्यास प्रत्येकी दोन पथके मार्गस्थ झाली आहेत. तसेच त्यातील एक पथक पुण्यात कार्यरत आहे. कोस्टगार्डची आणखी दोन पथके कोल्हापूरमध्ये आणि नौदलाची पाच व एसडीआरएफची दोन पथके सांगलीमध्ये पोहोचत आहेत. गतिमान बचाव कार्यासाठी आणखी पाच एनडीआरएफ टीम मागविण्यात आल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष रेल्वे गाडी
कोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून मिरज आणि कराड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.