दुष्काळी स्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक सोमवारी (दि. १५) मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर येणार आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता लातूर तालुक्यातील बोरगाव काळे या गावाची पाहणी करून पथक लातुरात मुक्कामी राहणार आहे.
मंगळवारी (दि. १६) पथक परभणीला रवाना होईल. जाताना रापूर तालुक्यातील पळसी व बावची या दोन गावांना ते भेटी देणार आहे. या भेटीदरम्यान गावकऱ्यांशी चर्चा करून खरीप हंगामातील पिकांचा उतारा, रब्बी हंगामातील पिकांची स्थिती, गावातील पिण्याच्या पाण्याची पातळी यासंबंधी चर्चा करून दुष्काळाच्या गांभीर्याचे अवलोकन केले जाणार आहे. दरम्यान, जिल्हय़ात शंभर टक्के गावे ५० पेक्षा कमी पसेवारीची असतानाही पथक दुष्काळ भागाची धावती पाहणी करणार असले, तरी या पाहणीतून फारसे गांभीर्य लक्षात येईल, अशी स्थिती नाही. जिल्हय़ातील ज्या गावांत भीषण स्थिती आहे, अशा गावांना पथकाची भेट ठरवणे आवश्यक होते.