News Flash

जळालेली पिके, पिचलेली माणसं आणि गळालेली जनावरे…

दुष्काळामुळे जळालेली पिके, पिचलेली माणसे अन् गळून गेलेली जनावरे यांच्या व्यथा आज, बुधवारी केंद्रीय समितीच्या पाहणीत व्यक्त झाल्या.

| August 20, 2015 03:30 am

दुष्काळामुळे जळालेली पिके, पिचलेली माणसे अन् गळून गेलेली जनावरे यांच्या व्यथा आज, बुधवारी केंद्रीय समितीच्या पाहणीत व्यक्त झाल्या. ‘तीन वर्षे झाली पाऊस नाही, चारा नाही, कर्ज कसे फेडायचे? लाखमोलाची गाय कत्तलखान्यात ढकलायची वेळ आल्यावर आत्महत्येशिवाय दुसरा काय पर्याय राहील?’, असा आर्त सवाल नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील उत्तम भिकाजी काळे या शेतक-याने समितीच्या सदस्यांना केला.
जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागातील पाथर्डी, नगर, पारनेर तालुक्यांतील शेतक-यांच्या व्यथा यापेक्षा वेगळ्या नाहीत. शेतक-यांना थेट मदतीची अपेक्षा असली तरी ती त्यांनी व्यक्त केली नाही, मात्र आपल्या मनातील दु:ख त्यांनी पथकासमोर बोलून दाखवले. अल्प पावसावर पेरणी केल्यावर जळून गेलेली पिके, कोरडय़ा ठक पडलेल्या विहिरींचे तळ, उद्ध्वस्त झालेल्या फळबागा, उपजीविकेला आधार देणारा दूधधंदाही आटून गेला. याकडे हताशपणे पाहणारा शेतकरी, हेच चित्र समितीच्या दौ-यात ठिकठिकाणी प्रखरतेने समोर आले.
राज्यात मराठवाडय़ासह इतर ठिकाणच्या दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाचे दौरे म्हणजे एक प्रकारचा ‘फार्स’ ठरत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्र्वभूमीवर नगरमध्ये आलेल्या, कृषी मंत्रालयाच्या दुष्काळ व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त व्ही. रथ व उपसचिव विजय सोनी यांनी शेतक-यांच्या मन विषण्ण करणा-या व्यथा शांतपणे ऐकून घेतल्या. भाषेची अडचण होती तरीही या व्यथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या दुभाषाच्या भूमिकेमुळे समितीच्या सदस्यांपर्यंत पोहोचल्या. तत्पूर्वी कवडे यांनी सकाळी सरकारी विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत जिल्ह्य़ातील परिस्थितीची माहिती देऊन वातावरणनिर्मिती केली होतीच.
पाथर्डी तालुक्यातील करंजी, आठरे-कौडगाव, मोहोज खुर्द व बुद्रुक, कोल्हार, नगर तालुक्यातील भोरवाडी, अकोळनेर, सारोळा कासार, पारनेरमधील अस्तगाव, रायतळे, वाळवणे, पवारवाडी (सुपा) या गावांना पथकाने भेटी दिल्या. प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. काही ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची कामे झालेली आहेत, मात्र पाऊसच नसल्याने त्याची उपयुक्तता अजून दिसायची आहे. करंजी येथील दिलीप विठोबा अकोलकर यांनी गेली तीन वर्षे संत्र्याच्या २०० झाडांची फळबाग टँकरचे पाणी आणून जगवली होती. ही सर्व झाडे आता जळून गेल्याने त्यांनी ती काढून टाकली होती. राजेंद्र तुळशीराम अकोलकर, प्रशांत जबाजी अकोलकर आदींच्या शेतातील मूग, कापूस, सोयाबीन पिकेही खुंटली आणि सुकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 3:30 am

Web Title: central team emotionally moved seeing drought
टॅग : Drought
Next Stories
1 जळालेल्या पिकांचे मोबाइलमध्ये चित्रण
2 अमित शहा यांच्या स्नानासाठी ५० दशलक्ष घनफूट पाणी!
3 राष्ट्रवादीला खरा धोका स्वकीयांच्या साठमारीचा
Just Now!
X