अशोक तुपे
संकरित गाईंच्या तुलनेत देशी गाईंमध्ये प्रतिकार क्षमता जास्त असते असा दावा आतापर्यंत तज्ज्ञ करत होते. पण आता गाईंमध्ये आलेला लम्पी या विषाणूजन्य आजारात तो दावा खोटा ठरला असून पशुवैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच लसीकरण करण्यावरूनही पेच उद्भवला आहे.
गाईंना लम्पी या संसर्गजन्य व विषाणूजन्य त्वचेचा आजार सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत झाला. तेथून तो देशात आसाममध्ये आला. सहा महिन्यांपूर्वी या आजाराचा शिरकाव राज्यात झाला. सर्वप्रथम परळी (जि. बीड) येथे लम्पी आजाराने ग्रासलेली गाय आढळून आली. त्यानंतर परभणी, नांदेड, जालना आदी जिल्ह्य़ात गाईंना हा आजार आढळला. या आजाराचा संपूर्ण राज्यात शिरकाव झाला आहे. नगर जिल्ह्य़ातही लम्पीने बाधित जनावरे आढळून आले आहे.
जनावरांना होणारा लम्पी हा आजार संसर्गजन्य व विषाणूजन्य आहे. गाईंमध्ये हा रोग प्रामुख्याने आढळतो. तरुण जनावरे या आजारास अतिसंवेदनशील असतात. लम्पी हा त्वचेचा रोग असून कॅपीपॉक्स या विषाणूमुळे त्याचा संसर्ग होतो. त्वचेच्या खाली या आजारात गाठी येतात. त्या पिकून त्यातून पू वाहू लागतो. त्वचेवरील वाळलेल्या खपल्यांमध्ये तो ३० ते ३५ दिवस जिवंत राहतो.
या रोगात ताप दोन ते तीन दिवस येतो. परंतु अनेकदा १०५ डिग्रीपेक्षा जास्त ताप येऊ शकतो. ताप येवून गेल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्वचेच्या खाली दोन ते पाच सेंटीमिटरच्या गाठी येतात. जनावरांच्या तोंडात, घशात व श्वासनलिकेत पूरळ व फोड येतात. त्यामुळे त्यांच्या तोंडातून लाळ गळत रहाते. जनावरे त्यामुळे अशक्त होतात. त्यांच्या पायावर सूज येते. गाठीमुळे शरीरावर चट्टे पडतात. तोंड, अन्न नलिका, श्वसननलिका व फुप्फुसामध्ये पूरळ निर्माण होऊन अल्सर होतो. यामध्ये जनावरांचा गर्भपात होतो. दूध देण्याची क्षमता कमी होऊन जाते. गायी अशक्त होतात. त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. दोन ते तीन टक्के गाईंचा मृत्यू होतो.
संशोधनाचा अभाव
लम्पी हा आजार विषाणूजन्य आहे. गेल्या तीस वर्षांत असा आजार आला नव्हता. त्यावर आद्याप लस आलेली नाही. संशोधन झालेले नाही. लाळ्या खुरकूत नंतर हा आजार पहिल्यादा आला आहे. शेळ्या व मेंढय़ांमध्ये वापरण्यात येणारी देवीच्या आजाराची लस वापरता येते, तसेच जनावरे बाधित झाल्यावर प्रतिजैविके व वेदनाशामक औषधे देता येतात. त्याने जनावरे बरी होतात. जनावरांना ताप येत असल्याने तापावरील औषधे दिली जातात, असे मुबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजीव गायकवाड व परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नितीन मरकडेय यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुचिकित्सा विभागाचे सुनील सहादतपुरे म्हणाले की, देशी गाईंनाही या विषाणूची बाधा झाली आहे. संकरित गाईंच्या तुलनेत ते प्रमाण अधिक असल्याचे ते म्हणाले.
डॉ. मरकडेय म्हणाले, की देशी गाईमध्ये काही गुणवैशिष्टय़े असतात. या गाईंचे दूध सकस असते. त्या तापमानाला अनुकूल असतात. तापमान कमी-जास्त झाले तरी त्या सहन करतात. परजीवी प्रादुर्भाव कमी होतो. रोगाला त्या बळी पडत नाहीत. असा आजपर्यंत अनुभव होता. पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसे छातीठोकपणे सांगत, पण आता त्या लम्पी या आजाराला बळी पडल्या आहेत. संकरित गाईंपेक्षा देशी गाईंना हा आजार झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता नगर जिल्ह्य़ात संकरित गाईंनाही हा आजार झाल्याचे आढळून आले आहे.
देशी व गावठी गाईंना अधिक बाधा
राज्यात एक कोटी दहा लाख देशी गायी आहेत. तर ३० लाख संकरित गायी आहेत. शुद्ध देशी गाई खिलार ९ लाख, लाल कंधारी १ लाख, डांगी, देवणी या प्रत्येकी ३० हजार, गावळाउ दीड हजार व कोकण कपिला १५ हजार गाई असून उर्वरित गायी या गावठी आहेत. त्याची वंशावळ नोंद नाही. या देशी व गावठी गायी विदर्भ व मराठवाडय़ात अधिक आहेत. राज्यात विदर्भ व मराठवाडय़ात लम्पीची लागण जास्त झाली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात व खानदेशात संकरित गाई जास्त आहेत. तेथे लागण कमी आहे. सुमारे दोन लाख गाईंना या आजाराची बाधा झाली आहे.
लाळ्या खुरकूत रोगाचा राज्यात प्रादुर्भाव पावसाळ्यात अधिक होतो. त्यामुळे पशुवैद्यकीय विभाग सप्टेंबरमध्ये लसीकरण करते. परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात २०० गाईंना शेळ्या व मेंढय़ांना देवीची लस देण्यात आली. त्या गाईला लम्पीची बाधा झाली नाही. पण आधी लाळ्या खुरकूतची लस द्यायची की लम्पीकरिता लस द्यायची असा पेच तयार झाला आहे. त्याचा निर्णय पशुवैद्यकीय विभागाने अद्याप घेतलेला नाही. काही जिल्ह्य़ात लम्पीकरिता मेंढय़ांची देवीची लस खरेदी करण्यात आली आहे.
– डॉ. नितीन मरकडेय प्राचार्य, पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी .
नगर जिल्ह्य़ात लम्पीने बाधित असलेली जनावरे आढळून आली. हा आजार पसरू नये म्हणून गोचिड नियंत्रण व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. गोठय़ात स्वच्छता असावी. डास व माशांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. बाधित जनावरांचे विलगीकरण करावे लागते. चांगल्या गाईंच्या सहवासात ही जनावरे येणार नाही म्हणून दक्षता घेतली तर या आजाराचा प्रसार होणार नाही. तशी उपाययोजना केली जात आहे.
-डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नगर