|| निखिल मेस्त्री

शिपाई संख्या कमी; करोनाकाळात सूचनांचे पालन कसे करावे?; शाळांना चिंता

पालघर : येत्या चार दिवसांत ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा  सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनामार्फत देण्यात आल्या आहेत. मात्र शासकीय अनुदानित शाळा व विद्यालयांमध्ये शिपायांची संख्या कमी असल्यामुळे शाळा सुरू करताना नियोजन करणे जिकिरीचे जाणार आहे.

पालघर जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रामध्ये बहुतांश विद्यार्थी हे अनुदानित शाळा, महाविद्यालयांमधून शिक्षण घेत आहेत. २३ नोव्हेंबरपासून  नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार असल्याने शाळा व्यवस्थापनमार्फत नियोजनाची तयारी सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था,  विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची तपासणी, वर्गखोल्यांतील व्यवस्था, आदी बाबी शाळा व्यवस्थापनाला करावयाची आहे. या सर्व व्यवस्थापनाची बहुतांश जबाबदारी ही शाळेतील शिपायांची आहे. त्यामुळे  नियोजन करताना शिपायांची दमछाक होणार आहे. महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती व इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये जंतुनाशक फवारणी करून देण्यात येणार असली तरी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, विद्यार्थी शाळेत येताना थर्मल तपासणी, विद्यार्थ्यांना मुखपट्टी, तसेच अंतर  व्यवस्था करणे, वर्ग स्वच्छता, वारंवार स्वच्छतागृहाची सफाई, वारंवार शौचालयाची सफाई, सॅनिटायझर व्यवस्था ही सर्व कामे शिपायांना करावी लागणार आहेत.

असे असले तरी  चुकून एखाद्या विद्याथ्र्याला करोनाचा संसर्ग झाला तर इतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला जबाबदार कोण असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. अनुदानित शाळा विद्यालयांमध्ये शिपायांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे.

त्यातच एवढे मोठे नियोजन व्यवस्थापन करणे त्रासदायक ठरणार आहे असेही शिपाई सांगत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या नियोजनासाठी शासनाने योग्य तो विचार करावा व शिपायांवर अतिरिक्त ताण येऊ  नये, अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केली आहे.

शाळा सुरू न करण्याची मागणी

शाळांमध्ये मोठी विद्यार्थी संख्या असल्याने  नियोजन होणे कठीण आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करणे अपेक्षित असून करोना संपेपर्यंत किंवा त्यावरील लस येईपर्र्यंत शाळा सुरू करू नये अशी मागणी आमदार कपिल पाटील व शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केलेली आहे.

विद्यार्थी संख्या मोठी असल्याने विविध बाबींच्या नियोजनाची मोठी जबाबदारी शिपाईवर्गावर आहे. यामुळे कामाचा मोठा ताण त्यांच्यावर येणार आहे. शिपायांच्या या समस्यांचा शासनाने विचार करणे अपेक्षित आहे.

– वाल्मीकी प्रधान, कार्यवाह, पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघटना