डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदाची सूत्रे डॉ. बी. ए. चोपडे यांनी डॉ. पंडित विद्यासागर यांच्याकडून बुधवारी स्वीकारली. जगातील २०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वाच्या सहकार्याने प्रयत्न करण्याची ग्वाही ‘मायक्रोबियल मॉलेक्युलर जेनेटिक्स’ विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ असलेल्या डॉ. चोपडे यांनी या वेळी बोलताना दिली.
विद्यापीठाचे १५ वे कुलगुरू (पूर्ण वेळ) म्हणून डॉ. चोपडे यांची राज्यपाल तथा कुलपती के. शंकरनारायणन यांनी पाच वर्षांसाठी नियुक्ती केली. डॉ. चोपडे बुधवारी सकाळीच विद्यापीठात दाखल झाले. पदभार घेण्यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच महात्मा फुले यांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. डॉ. चोपडे यांची पत्नी नलिनी याही या वेळी उपस्थित होत्या.
डॉ. विद्यासागर यांनी डॉ. चोपडे यांच्या हाती पदभार व मानदंड सोपविला. कुलगुरूंच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. धनराज माने, सहसंचालक डॉ. मोहम्मद फय्याज, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. गीता पाटील, डॉ. गणेश शेटकार, अधिष्ठाता डॉ. विलास खंदारे, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. एस. पी. झांबरे, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. अरुण खरात, डॉ. चेतना सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. पदभार घेतल्यानंतर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी महात्मा फुले सभागृहात प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.