News Flash

चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे? – नाना पटोले

करोना लसीच्या नफेखोरीला साथ, हा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार असल्याचंही म्हणाले आहेत.

“देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. केंद्र सरकारच्या निष्काळजीपणा आणि गलथानपणाने संपूर्ण देशाला करोनाच्या खाईत ढकलले आहे. ऑक्सिजन, इतर आवश्यक औषधे आणि उपकरणांच्या कमरतेमुळे करोना रूग्ण तडफडून मरत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सरकारसोबत मिळून लोकांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी भाजपाचे नेते हीन राजकारण करत आहेत. काँग्रसे नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि त्यांचा पक्ष करोना लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. त्यांनी भानावर येऊन ते पुण्याचे सेवक आहेत की पुनावालाचे? याचे उत्तर द्यावे.”, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, “केंद्र सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसतानाही महाराष्ट्र करोनाविरोधातील लढाई पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. देशातील भाजपशासीत राज्यांपेक्षा महाराष्ट्र करोनाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने मुकाबला करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारला वारंवार करोनाच्या संभाव्य धोक्याबाबत सावध करत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून करोनाचा मुकाबला करण्यासाठी सकारात्मक सूचना केल्या. पण त्यावर अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्रातील मंत्री व भाजपा नेते त्यांची खिल्ली उडवण्यात धन्यता मानत होते. काँग्रेस नेत्यांचे सल्ले वेळीच ऐकले असते तर आज देशाचे स्मशान झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी नक्कीच झाली नसती.”

तसेच, “राज्यातील भाजपाचे नेते तर या संकटकाळात लोकांच्या मृतदेहावर उभे राहून आपल्याला पुन्हा सत्ता मिळवण्याचा काही मार्ग सापडतोय का? याच्या शोधात आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी तर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत, केंद्र सरकारचा गलथानपणा आणि अपयशावर पांघरून घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील अनेक उच्च न्यायालयांनी आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने करोना संकटाळातील केंद्र सरकारच्या नियोजनशुन्य कारभाराचे वाभाडे काढले आहेत. केंद्र सरकारने आरोग्य सुविधा, औषधी, ऑक्सिजन पुरवठा, रेमेडीसिवर इंजेक्शन, व्हेंटिलेटर यांच्या वाटपावर नियंत्रण ठेवून संकटकाळात व्यापार सुरु केला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राज्यातील भाजपा नेत्यांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करून नफेखोरी करण्याचा प्रयत्न केला होता पण मुंबई पोलिसांनी तो उधळून लावला.” असं देखील पटोलेंनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेत्यांबद्दल अपशब्द काढले तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल  – पटोले

“काँग्रेस पक्षाने १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची आग्रही मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने ती मान्य करताना चलाखी करत लस पुरवठ्याची आपली जबाबदारी झटकून ती राज्य सरकारांवर ढकलली. केंद्राच्या या घोषणेनंतर लस उत्पादक कंपनी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने लसीचे नवीन दर नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. याप्रमाणे, पूर्वी खासगी रूग्णालयांना २५० रूपयांना मिळणारी लस आता ६०० रुपयांना मिळणार आहे. केंद्र सरकारला पूर्वीच्याच किंमतीत म्हणजे १५० रुपयांना ही लस मिळणार आहे. तर राज्य सरकाराला यासाठी ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. एकाच लसीच्या अशा तीन वेगवेगळ्या दरांना मान्यता देऊन केंद्र सरकार नफेखोरीला प्रोत्साहन देत आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी आवाज उठलला तर चंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या? चंद्रकांत पाटलांनी भान ठेवून बोलावे. भाडोत्री ट्रोलप्रमाणे खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेस नेत्यांबद्दल अपशब्द काढले तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल.” असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 7:05 pm

Web Title: chandrakant patil are you a servant of pune or of punawala nana patole msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रुग्णाचा मृतदेह गहाळ!
2 “रेमडेसिविर, लस पुरवठा वाढवा”, पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांची मागणी
3 हवाई मार्गाने ऑक्सिजनची वाहतूक करण्याबाबत केंद्रानं महाराष्ट्राला दिली परवानगी, पण….
Just Now!
X