”महाविकासआघाडी सरकार जर ५ वर्ष चालणार असेल तरी देखील आमचा काही आक्षेप नाही. आम्ही प्रखर विरोधी बनून अन्यायाविरुद्ध सरकारची झोप उडवत राहू ! राज्य सरकारला ट्रेन, बस सुरु झाल्यावर त्यामध्ये होणारी गर्दी दिसत नाही, परंतु यांना मंदिर सुरु करण्याआधीच तिथे होणाऱ्या गर्दीची चिंता वाटते !” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच, त्यांनी ”हिंमत असेल तर वेगवगेळं लढा. कोण जास्त मतं मिळवतं बघू” असं म्हणत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला आव्हान देखील यावेळी दिलं.

यावेळी चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशुन म्हणाले की, ”तुम्हाला घटना मान्य आहे की नाही? राज्यघटनेनुसार राज्यपाल हे कुठल्याही राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी शपथ दिल्याशिवाय तुम्ही मुख्यमंत्रीच होत नाहीत, त्यांनी शपथ दिल्याशिवाय तुम्ही मंत्री होऊ शकत नाहीत. अगदी उच्च न्यायालयच्या न्यायाधीशांना देखील राज्यपालांकडून शपथ घ्यावी लागते. कोणाचा आक्षेप आहे? पाच वर्षे तुम्ही सरकार चालवणार यावरही आमचा आक्षेप नाही. एकत्र निवडणुका लढवाल यावरही आक्षेप नाही. आमची सगळ्यासाठी तयारी आहे. तुम्ही जर पाच वर्षे सरकार चालवलं तर प्रखर विरोधी म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी आहे. तुम्ही तिघे एकत्रं लढणार…मी तर तुम्हाला आव्हान देतो की हिंमत असेल तर वेगवगेळं लढा. कोण जास्त मतं मिळवतं बघू. हिंमत नाही त्यामुळे एकत्र येऊन लढतात. झेंडा वेगळा, तत्वं वेगळी आणि एकत्र लढतात हे कसं काय चालणार? हिंमत असेल तर वेगवेगळं लढून दाखवा. परंतु, तुमच्यात हिंमत नाही म्हणून तुम्ही तिघे एकत्र लढणार. आम्हाला काय फरक पडतो आम्ही त्याची तयारी करू.”

तसेच, ”सगळ्या जगभरातील भविष्य व्यक्त करण्याचा ठेका संजय राऊत यांना दिलेला असल्याने, त्यांनी काही म्हटलं यावर मी काय बोलणार. आमची भूमिका स्पष्ट आहे. जर तुम्ही लोकल सुरू करत आहात. तर त्या लोकलमध्ये श्वास घ्यायला देखील वाव नसतो. एकमेकांचे श्वास एकमेकांच्या नाकात जात असतात. तिथं तुम्हाला संसर्ग होणार नाही का? मी लोकल सुरू करण्याबाबत टीका करत नाही. शेवटी हळूहळू जनजीवन सुरळीत करावं लागणार. किती दिवस हाताची घडी घालून बसणार. लोकल चालेत, ट्रेन चालते, विमान चालतं. उद्या १ तारखेपासून गार्डन चालतात, मग मंदिरं का नाही?” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.