महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थापनेची लवकरच वर्षपूर्ती होत आहे. या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या समाजोपयोगी कामाबाबत त्यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून अभिनंदन मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीच्या प्रोमोमध्ये, “कोणी कितीही आडवे आले तरी आडवं येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल’, असं वक्तव्य उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत. याच वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे.

“दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरे यांचं भाषण असंच झालं. शेण, गोमुत्र, आडवे करू, तिडवे करू अशा प्रकारचे शब्द मुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या माणसाच्या तोंडी बरोबर नाहीत. त्यांना अशीच भाषा वापरायची असेल, तर सर्वसामान्य माणसांनाही हे कळतं की जे सुरू आहे ते योग्य नाही. जर त्यांना कोणाला आडवं-तिडवं करायचं असेल, तर ते बोलण्यात वेळ का घालवत आहेत? गरजेल तो पडेल काय? त्यामुळे मला वाटतं त्यांना जे काही वाटतं ते त्यांनी करून टाकावं”, अस उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

प्रियम गांधी-मोदी यांच्या पॉवर ट्रेडिंग या पुस्तकात शरद पवार यांनी आयत्या वेळी भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीची सत्ता आणण्यास मदत केली असा दावा करण्यात आला आहे, त्यावर आपलं मत काय असा प्रश्नदेखील चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. पण यासंदर्भात मला काही माहिती नाही. त्याबद्दल लेखिकांना विचारा, असं पाटील म्हणाले.