लोकसभा निवडणुकीच्यावेळी आम्ही शरद पवारांना बारामतीत अडकवून तिथेच पिंगा घालायला लावला. पवारांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली या ठिकाणी केली आहे. सांगलीतल्या कवठे पिराण गावात हिंदकेसरी मारूती माने यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्याच कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

या कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, सरपंच भीमराव माने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शरद पवारांचे बालेकिल्ले आम्ही उद्ध्वस्त केले. लोकसभा निवडणुकीत आम्ही शरद पवारांना जेरीस आणले मात्र ते थोडक्यात वाचले असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी भाजपा शिवसेना युतीबाबतही त्यांनी भाष्य केले. आमची युती अभेद्यच राहणार आहे, एखादा नेता सेनेतून भाजपात आला तर सेनेच्या नेत्यांनी वाईट वाटून घेऊ नये. कारण ताटात काय आणि वाटीत काय? सगळे सारखेच असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सेना नेत्यांनाही टोला लगावला.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला देशात अभूतपूर्व यश मिळाले. महाराष्ट्रातल्या ४८ पैकी ४२ जागा भाजपा आणि शिवसेना युतीला मिळाल्या. या लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीही आम्हीच जिंकू असा दावा भाजपाने केला होता. कांचन कुल या भाजपाच्या उमेदवार होत्या तर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या उमेदवार बारामतीतून उभ्या होत्या. बारामतीत चंद्रकांत पाटीलही निवडणूक पूर्ण होईपर्यंत तळ ठोकून होते. सुप्रिया सुळे या बारामतीतून विजयी झाल्या. मात्र राज्यात परिवर्तन घडेल असा जो दावा शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात होता तो काही खरा ठरला नाही.

लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर सगळ्यांनाच वेध लागले आहेत ते महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना आम्ही लोकसभेत पिंगा घालायला लावला असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीतही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार, निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट आहे. चंद्रकांत पाटील यांनी जो टोला लगावला त्याला शरद पवार काही उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.