चंद्रपूर
करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व चंद्रपूर जिल्हयात करोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चंद्रपूर जिल्हयातील शाळा 31 ऑगस्ट पर्यंत सुरू करण्यात येऊ नयेत, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ४ ऑगस्टपासून कोणत्याही स्थितीत जिल्हा परिषद शाळा सुरु करणार, असे जाहीर केल्यानंतर शाळा ३१ ऑगस्टपर्यंत सुरू करणार नाही, असा निर्णय आल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
३१ जुलै रोजी चंद्रपूर जिल्हयातील संस्थाचालक तसेच पालकांच्या शिष्टमंडळाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व तुर्तास शाळा सुरू न करण्याची मागणी केली. आ. मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांच्याशी तात्काळ दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांच्याशी चर्चा केली व सद्यस्थितीत करोनाचा प्रकोप बघता जिल्हयातील शाळा ४ ऑगस्टपासून सुरू होण्याच्या बातमीमुळे जिल्हयातील पालकांमध्ये तसेच संस्थाचालक व शिक्षकांमध्ये असलेल्या भितीची कल्पना दिली. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत शाळा सुरू करण्यात येऊ नयेत, अशी विनंती केली.
शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनीसुध्दा ३१ ऑगस्टपर्यंत शाळा सुरू करण्यात येणार नाहीत असे आ. मुनगंटीवार यांना आश्वस्त केले. त्यामुळे आता पालक, शिक्षक व संस्थाचालकांना दिलासा मिळाला आहे.